बेड तसेच ऑक्सीजन न मिळाल्याने श्रीरामपूरच्या तरूणासह तिघांचा नगरमध्ये मृत्यू
File Photo

बेड तसेच ऑक्सीजन न मिळाल्याने श्रीरामपूरच्या तरूणासह तिघांचा नगरमध्ये मृत्यू

नगरमधील करोना उपचाराची स्थिती भयावह ||अत्यावस्थ रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड मिळेना|| आरोग्य विभाग नॉटरिचेबल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात करोनाचा हाहाकार सुरू असून हास्पीटलमध्ये बेड न मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव परिसरातील 30 वर्षीय तरूणाचा नगरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

तर उपचार सुरू असताना ऑक्सीजनचा पुरवठा खंडित झाल्याने अन्य दोन करोना रूग्णांना जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाशी वारंवार संपर्क साधाला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथून करोना बाधित तरूणाला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, येथे आल्यावर त्यांना बेड शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. एवढेच नव्हेतर येथील कर्मचार्‍यांनी त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी नगर शहरातील बहुतांश हॉस्पिटलमधील दरवाजे ठोठावले.

डॉक्टरांना विनंती केली. मात्र, कोठे बेड शिल्लक नाही, ऑक्सीजन रेमडीसीवर इंजेक्शन नसल्याचे सांगत अ‍ॅडमीट करण्यास नकार दिला. परिणामी या रुग्णास पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आणले गेले. मात्र, तेथे आणत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला. याची माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह वाहनातून काढून आत घेण्याची विनंती केली. मात्र, यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. असे नातेवाईकांनी आरोप केला. याबाबत जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधाला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

तसेच रविवारी ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायलर होत आहे. या प्रकरणी दोषी कोण, कोणावर कारवाई केली. श्रीरामपूरच्या तरूणासह तिघांचा नगरमध्ये मृत्यू की नाही, याबाबत देखील रुग्णालय प्रशासन मूग गिळून गप्प आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

नगर शहरातील करोनावरील उपचारांची स्थिती भयावह होतांना दिसत आहे. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील कोविड बेड संपले असून यामुळे आता सामान्य नागरिकांनी उपचार कोठे करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महापालिकेच्या कोविड डॅश बोर्डवर व्हेंटिलेटरचे (आयसीयू) 185, ऑक्सिजनचे 172 बेड शिल्लक असल्याचे दर्शनविण्यात येत असले, तरी शहरातील परिस्थिती मात्र वेगळीच आहे.

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 13 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. यातील मोठ्या संख्याने रुग्णांवर उपचार नगरमध्ये शासकीय आणि खासगी रुग्णायात सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना विभागाच्या क्षमतेच्या दुप्पट रुग्ण असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयातील करोना उपचारांचे नियोजन पूणपणे कोलमडले आहे.

रविवारी ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा प्रशासन बोलण्यास तयार नाही. जिल्हा रुग्णालयातील प्रमुख आणि अन्य डॉक्टर साधा फोन घेत नाहीत. यामुळे जिल्हा रुग्णालयात काय सुरू आहे, हे कळण्यास मार्ग नाही. अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. यामुळे शहरातील करोना उपचारांची स्थिती हाताबाहेर गेल्याचे आता जावणवत आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com