बाप-लेकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी

बाप-लेकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

आम्हाला शिवीगाळ करु नका, आमचे पैसे देऊन टाका, असे म्हणाल्याचा राग आल्याने आठ ते नऊ जणांनी मिळून बाप-लेकाला चॉपर, लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील गोटूंबा आखाडा परिसरात दि. 28 मे रोजी घडली.

सचिन अण्णासाहेब हरिश्चंद्रे (वय 31 वर्षे), राहणार गोटूंबा आखाडा, ता. राहुरी. हा तरुण राहुरी ते शनि शिंगणापूर रस्त्यावर गोटूंबा आखाडा परिसरात रसवंतीगृह चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दि. 28 मे रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान सचिन हरिश्चंद्रे व त्यांचे वडील अण्णासाहेब हे त्यांच्या रसवंतीगृहासमोर उभे होते. तेव्हा तेथे आरोपी रसवंतीगृहासमोर आले. आणि सचिन याला शिवीगाळ करू लागले.

तेव्हा सचिन त्यांना म्हणाला, तुम्ही आम्हाला शिवीगाळ करु नका. गाडी थांबविण्यासाठी आमच्या कडून घेतलेले पैसे परत देऊन टाका, असे म्हणाल्याचा राग आल्याने सचिन हरिश्चंद्रे याला चॉपर, लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी सचिन याचे वडील आले असता त्यांना देखील जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच तुम्हाला पिस्तुलाने गोळ्या घालून ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. या घटनेत सचिन हरिश्चंद्रे व त्याचे वडील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सचिन अण्णासाहेब हरिश्चंद्रे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी अक्षय वाडेकर, बबलू मोरे दोघे राहणार शिर्डी, ता. राहाता. तसेच इतर 6 ते 7 अनोळखी इसमांवर मारहाण व ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com