मारहाण करत लुटमार करणारे दोघे जेरबंद

संशयितांकडून पाथर्डीतील तीन घटनांचा उलगडा
मारहाण करत लुटमार करणारे दोघे जेरबंद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

वाहन अडवून डोक्यात लोखंडी रॉड मारून लूटमार कारणार्‍या दोघांना पाथर्डी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. यात एक अल्पवयीन मुलाचा सामावेश आहे. त्यांच्याकडून पाथर्डीतील तीन घटनांचा उलगडा झाला आहे.

अजय पिराजी पवार (19, रा.शिक्षक कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या दोघांनी पाथर्डी शहर व तालुक्यात तीन ठिकाणी लोकांना रस्त्यात अडवून बळजबरीने मारहाण करून ऐवज लुटल्याचा घटना सोमवारी रात्री घडल्या आहेत.

फिर्यादी जयराम भानुदास ढाकणे हे मोटारसायकलवरून शिक्षक कॉलनीतून गायछाप कारखान्याकडे रात्री दहा वाजता जात असताना बाबुजी आव्हाड कॉलेज गेट जवळ दोघांनी लोखंडी रॉड व कुर्‍हाडीचा धाक दाखवून ढाकणे यांच्या खिशातील पैसेे बळजबरीने काढून घेत असताना ढाकणे यांनी या चोरट्यांना प्रतिकार केला असता त्यातील एकाने लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर दुखापत करून ढाकणे यांना जखमी केले. दरम्यान किरण कैलास मरकड रा.निवडुंगे ता.पाथर्डी यांना सुध्दा याच दोघांनी याच परिसरात मोबाईल व 700 रुपये व एटीएम कार्ड बळजबरीने काढून घेतल्याची घटना या घटनेच्या काही वेळ अगोदर घडली होती.

तसेच याच दिवशी पाथर्डी - माणिकदौंडी रोडवर पोलीस वसाहतीजवळ याच संशयितांनी सतीश धर्मे यांना मारहाण करून यांच्या खिशातील पाचशे रुपये व मोबाईल या चोरट्यांनी बळजबरीने काढून घेतले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रात्रभर या संशयितांचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता या संशयितांचा पोलिसांना सुगावा लागल्यानंतर सुमारे तीन तास त्यांच्या पाठलाग करून एकास माळी बाभुळगाव शिवारात तर दुसर्‍याला पाथर्डी- शेवगाव रोडवरील संत सावतामाळी नगरमधून पकडण्यात आले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर रसाळ, भगवान सानप, संदीप कानडे, कृष्णा बडे, एकनाथ बुधवंत, अनिल बडे, अरुण शेकडे, देविदास तांदळे, पी.एन.गरगडे, किशोर पालवे, नारायण कुटे,अतुल शेळके या पोलीस कर्मचार्‍यांचा सहभाग होता.पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे हे या गुन्हेचा तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com