रॉडने मारहाण करीत लुटले

नारायणडोह येथील घटना: तिघे जखमी
रॉडने मारहाण करीत लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

तीन चोरट्यांनी शेतकर्‍याच्या घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींना लोखंडी रॉड व काठीने मारहाण करत 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बुधवारी मध्यरात्री नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात ही घटना घडली. चोरट्यांच्या हल्ल्यात दादासाहेब पंढरीनाथ शिरसाठ (वय 64), त्यांची पत्नी शकुंतला दादासाहेब शिरसाठ (वय 60) व आई लक्ष्मीबाई पंढरीनाथ शिरसाठ (वय 88) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी दादासाहेब शिरसाठ यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तीन चोरट्यांविरूध्द भादंवि कलम 394, 397, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री फिर्यादी दादासाहेब, त्यांची पत्नी व आई घरासमोरील पत्र्याच्या पडवीत झोपले होते. तीन चोरट्यांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पडवीत प्रवेश करून काही एक न बोलता लोखंडी रॉड, काठीने दादासाहेब, त्यांची पत्नी व आईला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले.

चोरट्यांनी फिर्यादीच्या पत्नी व आईच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गणेश इंगळे, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक बोराडे, चव्हाण यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com