मुलीची छेड काढणार्‍या तरुणाला आश्रय देणार्‍या पतीपत्नीला मारहाण

केंदळ येथील घटना; राहुरीत सहा जणांवर गुन्हा दाखल
मुलीची छेड काढणार्‍या तरुणाला आश्रय देणार्‍या पतीपत्नीला मारहाण

राहुरी (प्रतिनिधी) - मुलीची छेड काढणार्‍या तरूणाला आश्रय दिला म्हणून सहा जणांनी मिळून दोघा पती पत्नीला लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. 27 मे रोजी राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ सोन्याबापू देशमुख यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 27 मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास केंदळ बुद्रुक येथील साईनाथ देशमुख यांच्या घरासमोर यातील फिर्यादी साईनाथ देशमुख यांची वहिनी सिंधू यांना आरोपी हे काठ्यांनी मारहाण करीत होते. ते पाहून साईनाथ देशमुख व त्यांची पत्नी जमुना हे दोघे भांडणे सोडवासोडवी करण्यासाठी गेले. त्यांनी आरोपींना विचारले, तुम्ही का मारहाण करता? त्यावेळी आरोपी म्हणाले, तुम्ही तुमचा पुतण्या बाबासाहेब अशोक बर्डे याला आश्रय का देता? तो आमच्या मुलीची छेड काढतो. असे म्हणून आरोपींनी साईनाथ देशमुख व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने व लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

साईनाथ देशमुख यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सोमनाथ ज्ञानदेव गरड, संजय ज्ञानदेव गरड, मारुती ज्ञानदेव गरड, रेणुका सोमनाथ गरड, वनिता संजय गरड, आरती मारुतीराव गरड (सर्व रा. केंदळ बुद्रुक ता. राहुरी) या सहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा पुढील तपास हवालदार रवींद्र डावखर करीत आहेत.

Related Stories

No stories found.