मारहाण करून लुटणारी टोळी जेरबंद

कोतवाली पोलिसांची कामगिरी
मारहाण करून लुटणारी टोळी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाडेकरू प्रवाशाची वाट पहात असलेल्या कार चालकाला मारहाण करुन त्याच्याजवळची रोकड लुटणारी टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली. या प्रकरणात पोलीसांनी वेगाने तपासाचे चक्र फिरवत एकीकडे फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असताना गुन्हे शोध पथकाने ही लटू करणार्‍या टोळीतील काही जणांच्या मुसक्या आवळल्या.

याप्रकरणी प्रविणकुमार सुरेश सिंग (रा अंबरनाथ, ठाणे) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते स्विफ्ट कारने भाडे घेवून नगरमध्ये आले होते. परतीचे भाडे करण्यासाठी रात्री साडेनऊ वाजता कायनेटिक चौकात थांबले होते. त्याच वेळी 8 ते 9 जणांनी त्यांना चाकु, काठी, लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी केले. त्यांना गाडीत बसवून त्यांचे बँक खात्यावरील पैसे दमदाटी करुन जबरदस्तीने एटीएममधुन काढून हिसकावून घेतले. तसेच मोबाईल व ब्लुटुथ काढुन त्यांना गाडीसह जस्ट एव्हेन्यु हॉटेल येथे सोडून दिले.

सिंग यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी जबर मारहाण करून दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपींचा गुन्हे शोध पथकासह आरणगाव रोडवर शोध घेत असताना काही आरोपी संशयितरित्या गुन्ह्यात वापरलेली बुलेट व होंडा ड्रिम युगा मोटारसायकलसह रोडच्या कडेला अंधारात उभे असलेले आढळून आले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. यात रोहित नामदेव लंगोटे, निलेश सुनिल पेंडूळकर, अभिषेक अशोक शेलार, ऋषिकेश अनिल डाडर, सिध्दार्थ संतोष निमसे व अन्य दोघे असे सापडले. त्यांची अंगझडती घेतली असता लुटीच्या गुन्ह्यात वापरलेला लोखंडी चाकू, स्टीलचे फायटर, गुन्ह्यातील रोख रक्कम, बुलेट गाडी, ड्रीम युगा मोटार सायकल असा एकुण 1 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

12 जानेवापर्यंत कोठडी

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करून शनिवारी सकाळी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 12 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com