
राजूर |वार्ताहर| Rajur
वाद मिटून घे’ म्हणाल्याचा राग आल्याने 10 जणांच्या टोळक्याने मोटारसायकलहून येत घराच्या दरवाजावर लाथा मारत घरात घुसून अचानक हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने पांडुरंग सोमा खेताडे (वय 55, रा. आंबेवंगण, ता. अकोले) यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा व पत्नी जबर जखमी झाली आहे. ही घटना अकोले तालुक्यातील आंबेवंगण येथे 9 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजूर पोलिसांनी 10 जणांविरुद्ध दंगलीसह खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.
याबाबत धोंडू पांडुरंग खेताडे (वय 25, रा. आंबेवंगण) याने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास फिर्यादी धोंडू पांडुरंग खेताडे त्याची आई वडील आंबेवंगण ता. अकोले येथे घरी असताना त्याचे ओळखीचे बबलू कदम व प्रमोद घारे (दोघेही राहणार मान्हेरे, तालुका अकोले) व त्यांचे मित्र वैभव डगळे, वैभव गभाले, सागर भोईर, विकास गभाले, अक्षय कोंडार, विठ्ठल पोटकुले, विनोद शिंदे, नकुल मुंढे व इतर तीन चार अनोळखी इसम घरी आले. फिर्यादीने सचिन इदे यांस बबलू कदम यासोबतचे वाद मिटवून घे, असे म्हणाल्याच्या कारणावरून वरील दहा ते बारा जणांनी धोंडू खेताडे याच्या घरी येत घराच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडला व आतून कडी लावून फिर्यादीस मारण्यास सुरुवात केली.
मात्र त्याचे वडील पांडुरंग सोमा खेताडे मध्ये पडले. त्यांनाही या टोळक्याने काठ्याच्या दांडक्याने मारहाण केली. सदर मारहाण सुरू असताना ते जोरजोरात ओरडत होते. धोंडू याच्या आईलाही मारहाण झाल्याने तिघेही रक्त भंबाळ झाले. पांडूरंग खेताडे यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने चुलता किसन सोमा खेताडे व चुलती हिराबाई किसन खेताडे हे आल्यानंतर सर्वजण पळून गेले. वडील पांडुरंग खेताडे यांना फिर्यादी व त्याची आई यांनी उठविण्याचा प्रयत्न केला मात्र ते काही एक प्रतिसाद देत नव्हते. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मयत पांडूरंग खेताडे यांचा मृतदेह शव शवविच्छेदनासाठी लोणी येथे नेण्यात आला आहे. जखमी धोंडू खेताडे व त्याची आई यांच्यावर राजुर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत धोंडू खेताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दहा आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 261/2023 भारतीय दंड संहिता 143, 147, 148,149, 302, 452, 342, 324, 323 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे करत आहे.