चौघांच्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

कुठे घडली घटना; पोलिसांत खुनाचा गुन्हा, एक अटकेत
चौघांच्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्रीच्या वेळी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुनील रामभाऊ नवगिरे (वय 50 रा. वाकोडी ता. नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुनीलची आई रूक्मिणी रामभाऊ नवगिरे (वय 65) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारहाण करणार्‍या संशयीत आरोपी सागर जगन्नाथ नवगिरे (वय 31 रा. वाकोडी) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

त्याला आज (गुरूवारी) न्यायालयासमोर हजर केेले जाणार आहे. भिंगार कॅम्पचे प्रभारी निरीक्षक जे.सी.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पोलीस अंमलदार रमेश दरेकर, समीर शेख, रघुनाथ कुलांगे यांच्या पथकाने सागर नवगिरे याला अटक केली. या घटनेची अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मुलगा सुनील हा पेंटींगचे काम करत होता. त्याची पत्नी, तीन मुले सावेडी उपनगरातील सहकारनगर येथे राहत होते. सुनील हा त्याची आई रूक्मिणीसोबत तीन महिन्यापासून वाकोडी येथे राहत होता. 24 ऑगस्ट, 2022 रोजी सुनील हा चार वाजता कामाचे पैसे घेऊन येतो म्हणून घरून गेला तो पुन्हा घरी आला व सायंकाळी सहा वाजता मळ्यातून येतो म्हणून गेला तो पुन्हा त्या दिवशी घरी आलाच नाही.

दरम्यान 24 ऑगस्ट रोजी रात्री दीड वाजता सुनील याला योगेश (पूर्ण नाव माहिती नाही) याने घरी आणले तेव्हा सुनीलच्या डोक्यावर व कपाळावर जखमा होत्या. तेव्हा फिर्यादी यांनी सुनीलला विचारले तुला कोणी मारले. तेव्हा त्याने फिर्यादीला सांगितले की,‘मला किशोर सुर्यवंशी, मोढवे, सागर नवगिरे, अविनाश नवगिरे (पूर्ण नावे माहिती नाही) यांनी वाकोडी गावातील चौकात शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली व ग्रेनाईच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले’. दरम्यान मारहाणीचे कारण त्याने फिर्यादी यांना सांगितले नव्हते.

त्याच रात्री सुनीलला त्रास होवू लागल्याने त्याला सुरूवातीला जिल्हा शासकीय रूग्णालयात व नंतर पुणे येथील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सुरूवातीला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान सुनीलचा 10 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे. यानंतर संशयीत आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर नवगिरे याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com