
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
मागील भांडणाच्या कारणावरून आठ जणांनी मिळून एका जणाला लाथा बुक्क्यांनी तसेच लाकडी दांडा व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे घडली असून यात महेश दगडू कावरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
सोमनाथ दगडू कावरे, वय 30 वर्षे, राहणार माहेगाव, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सिोमनाथ कावरे यांचे भाऊ महेश कावरे हे माहेगाव गावातील दिपक दिगंबर गाडे यांच्या शेतात ट्रॅक्टरने रोठा मारीत होते. त्यावेळी तेथे आरोपी आले आणि त्यांनी महेश कावरे यांना मागील भांडणाच्या कारणावरून लाथा बुक्क्यांनी तसेच लाकडी दांडा व गजाने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत महेश कावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमनाथ दगडू कावरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश अशोक गाडे, सागर अशोक गाडे, आदित्य जालिंदर गाडे, मच्छिंद्र संदेश गाडे, कमल मच्छिंद्र गाडे, स्वप्नील मच्छिंद्र गाडे, राहुल राजेंद्र गायकवाड, अक्षय आढाव सर्व राहणार माहेगाव, ता. राहुरी. या आठ जणांवर गुन्हा रजि. नं. 1253/2022 भादंवि कलम 326, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिंदे हे करीत आहेत.