सोनईच्या तत्कालीन दोघा पोलीस अधिकार्‍यांसह तिघा कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

दोघांना मारहाण प्रकरण || आरोपींमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहायक फौजदार संजय चव्हाण व कर्मचारी बाबा वाघमोडेंचा समावेश
सोनईच्या तत्कालीन दोघा पोलीस अधिकार्‍यांसह तिघा कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

सोनई |वार्ताहर| Sonai

दोन युवकांना अमानुष मारहाण केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल सह तीन कर्मचारी निलंबित केल्यानंतर लगेचच मंगळवार दि.26 ला रात्री उशिरा पीडित राजेंद्र मोहिते यांनी सोनई पोलीस ठाण्यात बागुल सह तीन कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते (वय 24) व्यवसाय- मजुरी यांनी फिर्यादी दिली की 14 एप्रिलला सोनई पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घरात शोध घेऊन पोलीस ठाण्यात हजर होण्यास घरच्यांना सांगितले. दुसर्‍या दिवशी सोनई-राहुरी रोडवरील उड्डाणपुलाजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी रस्त्यावर खाली पाडून मारहाण करून पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यात बागुल व उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी गिरणीच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. यातच माझ्या कानातून रक्तही आले. त्यानंतर बेडी घालून बसवले. थोड्यावेळाने एका अल्पवयीन मुलालाही पोलीस ठाण्यात मारहाण करून मला लावलेल्या बेडीतच त्या मुलाला लावले. कर्मचारी बाबा वाघमोडे यांनीही मारहाण करून शिवीगाळ केली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

भारतीय दंड विधान कलम 341, 342, 324, 323, 166, 504, 34 व बाल न्याय अधिनियम 2000 कलम 23 नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहायक फौजदार संजय चव्हाण व कर्मचारी बाबा वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com