पैसै न दिल्याने भिशी चालकाच्या पंटरकडून एकास बेदम मारहाण

पैसै न दिल्याने भिशी चालकाच्या पंटरकडून एकास बेदम मारहाण

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

लॉकडाउन उघडताच शहरातील भिशी चालकांचे कारनामे पुन्हा सुरू झाले आहे. भिशी चालकांनी वसुलीचा तगादा सुरू केला आहे. भिशीचे पैसे न दिल्याने काल एका भिशी चालकाच्या वसुली पंटरने भिशीच्या सदस्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा युवक गंभीर जखमी झाला असून तो खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

संगमनेर शहरात बेकायदेशीर भिशी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या बेकायदेशीर व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैसे मिळत असल्याने अनेक जण हा व्यवसाय करताना दिसत आहे. शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या भिशा अस्तित्वात आहे. सदस्यांकडून जमा झालेल्या पैशांचा लिलाव करून काही सदस्यांना हे पैसे वाटले जातात. शहरातील सामान्य माणसापासून बड्या उद्योगपती पर्यंत अनेक जण या व्यवसायात सहभागी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायात अपप्रवृत्ती शिरली आहे.

सदस्यांकडून भिशी चालक पठाणी वसुली करत आहे. काही भिशी चालकांनी वसुलीसाठी काही पंटरची पगारावर नियुक्ती केली आहे. हे पंटर अतिशय निर्दयपणे वसुली करताना दिसत आहे. शहरात त्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काल एका युवकास भिशीचे पैसे न दिल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. या युवकाला गंभीर मार लागल्याने त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पोलिसांनीही या युवकाची भेट घेतल्याचे वृत्त आहे. पोलीस प्रशासन भिशी व्यवसायाबाबत आता काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध भिशी त्वरित बंद कराव्या याबाबत संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालून सविस्तर माहिती घ्यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com