नांदुर्खीत जमिनीच्या वादातून एकास बेदम मारहाण

चौघांविरुध्द गुन्हा दाखल ; मुख्य आरोपीस अटक
नांदुर्खीत जमिनीच्या वादातून एकास बेदम मारहाण

नांदुर्खी (वार्ताहर) / Nandurkhi - राहाता तालुक्यातील नांदुर्खी, वाणी वस्ती याठिकाणी असलेल्या जमिनीची मोजणी होऊन जमीन ताब्यात का देत नाही, असे विचारले असता एका व्यक्तीसह अन्य तिघा अनोळखी व्यक्तींनी तरुणास बेदम मारहाण केली. यात युवक जखमी झाला असून त्यास शिर्डीतील साईसुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे.

भारत अण्णासाहेब वाणी यांची नांदुर्खी येथे गट नंबर 231 मध्ये सुमारे 4 एकर क्षेत्र शेतजमीन आहे मात्र सदरचे प्रत्यक्ष क्षेत्र कमी भरत असल्याकारणाने सुमारे 8 महिन्यांपूर्वी मोजणी करणेबाबत तहसील कार्यालय राहाता व भूमिलेख कार्यालय राहाता येथे भारत वाणी यांनी अर्ज केलेला होता. मात्र फेब्रुवारी 2021 मध्ये तहसीलदार यांच्यामार्फत मोजणी करण्यात येऊन सुमारे 70 गुंठे जमीन गोरक्षनाथ वाणी यांच्या कब्जात निघाली.

त्यावेळी तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्तात सदर क्षेत्र ताब्यात घेण्याचे सांगितले होते; परंतु त्यापूर्वी गोरक्षनाथ वाणी यांच्या सोबत भारत वाणी यांनी सामंजस्याने चर्चा करून त्याने सदर 70 गुंठे क्षेत्र देण्याचे कबुल केले होते; परंतु गोरक्षनाथ वाणी या गोष्टीला टाळाटाळ करत असल्याने सदर प्रकरण भारत वाणी यांनी तहसीलमध्ये टाकले हे वृत्त गोरक्षनाथ वाणी आणि तात्याबा नाथा वाणी यांना कळताच त्यांनी भारत वाणी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकाने एक टणक वस्तू डोक्यावर व पायावर मारल्याने भारत वाणी गंभीर जखमी झाले. यात हल्ला केलेल्या आरोपीचे मोटारसायकल, हत्यारे पोलीस स्टेशनला जमा आहे; काल रात्री याप्रकरणातील आरोपी गोरख वाणी यास जेरबंद करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल त्रिभुवन यांनी दिली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारत वाणी यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 0247/2021 प्रमाणे गोरक्षनाथ वाणी व अन्य तीन सहकारी यांचे विरुध्द भादंवि कलम 324,323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com