सावधान: 'रेमडेसिवीर' इंजेक्शनसाठी तुमची होऊ शकते ऑनलाईन फसवणूक

सायबर पोलिसांनी केले 'हे' आवाहन
सावधान: 'रेमडेसिवीर' इंजेक्शनसाठी तुमची होऊ शकते ऑनलाईन फसवणूक

अहमदनगर|Ahmedagar

जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून अनेकांना अटक केली आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा पाहून सायबर गुन्हेगारही सक्रीय झाले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनची रुग्णांना दोन ते तीन तासात डिलिव्हरी मिळेल, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. हा मेसेज व्हायरल करणाऱ्या अज्ञात मोबाईलधारक व बँकखाते धारकाविरोधात नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सध्या करोना रुग्णांची झपाट्याने संख्या वाढत असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे आमिष दाखविले जात आहे. पैसे भरण्यासाठी एक खाते क्रमांकही दिला जात आहे. अशाच स्वरूपाचा मेसेज सुवेंद्र गांधी यांच्या कार्यकर्त्यांना आला होता. अशा मेसेजच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी गांधी यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

अधीक्षक पाटील यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत. दरम्यान रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत अशा प्रकारचा मेसेज आला तर कुठल्याही खाते क्रमांकावर पैसे टाकू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com