बारागाव नांदूरच्या महिला वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

बारागाव नांदूरच्या महिला वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांना आपल्याच विभागात समुदाय आरोग्य अधिकारी महिलेकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ.वृषाली तुळशिराम कोरडे (वय 39) रा. राहुरी ता. राहुरी यांनी आपल्याच विभागात कार्यरत असलेल्या एका महिला समुदाय आरोग्य अधिकार्‍याकडे लाचेची मागणी केली होती. माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2021 या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळणे करिता तक्रारदार यांनी डॉ. वृषाली सूर्यवंशी यांची भेट घेत विचारणा केली होती. त्यांनी मिळणार्‍या रक्कमेतून निम्मी रक्कम मला मिळावी, अशी मागणी केली होती.

पैसे मागणी झाल्यानंतर दुसर्‍या भेटीत पुन्हा डॉ. सूर्यवंशी यांनी तू काही तरी रक्कम दे तरच मी तुझे बिलासंबंधी पुढील कार्यवाही करेल, असे सांगितल्याने तक्रारदार यांनी 4 हजार 50 रुपयांची रक्कम अदा केली. 3 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी भेटीमध्ये डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे बिलासंदर्भात विचारणा केली.

त्यावेळी रक्कमेची तडजोड होऊन 10 हजार तरी द्यावे असे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 6 फेबु्रवारी रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणीमध्ये 10 हजार मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार काल दि. 8 रोजी बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तक्रारदार यांच्याकडून महिला वैद्यकीय अधिकरी डॉ. सुर्यवंशी यांनी रोख स्वरूपात लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक हरिष खेडकर, पोलिस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलिस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलिस हवालदार हारूण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com