
राहुरी |तालुका वार्ताहर| Rahuri
राहुरी पोलिस पथकाने तालुक्यातील बारागांव नांदूर परिसरात मुळा नदीपात्रात वाळू तस्करीवर छापा टाकला. यावेळी पथकाने दोन वाहनांसह दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकला गजाआड केले. मात्र एकजण पसार झाला आहे.
पोलिस नाईक सागर गंगाधर नवले यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक 13 मे 2023 रोजी रात्री 10.30 वाजे दरम्यान पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, पोलिस नाईक गणेश सानप, थोरात व शिरसाठ यांनी राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर परिसरात मुळा नदीपात्रात छापा टाकला. त्यावेळी बारगाव नांदुर शिवारातील मोमन आळी येथील मुळानदीच्या पात्रामध्ये दोन झेनॉन गाड्या उभ्या दिसल्या. त्यातील एका गाडीमध्ये दोन इसम शासकीय वाळू चोरून भरताना दिसले. पोलिस पथकाला पाहताच ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिस पथकाने पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले. मात्र एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.
शामराव रामदास माळी, (वय 50 वर्षे), रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी. असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून अंकुश रोहीदास बर्डे, रा. बारगाव नांदुर, ता. राहुरी. असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिस पथकाने दोन लाख रूपये किंमतीची दोन टाटा झेन वाहने व पाच हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू असा एकूण 2 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस नाईक सागर गंगाधर नवले यांच्या फिर्यादीवरून आरोपी शामराव रामदास माळी, अंकुश रोहीदास बर्डे (फरार) दोघे रा. बारगाव नांदुर, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. 515/2023 भादंवि कलम 379, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम 15, 3 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.