बँकेतील दरोडेखोर पोलिसांना शरण

शेंडीत पोलीस दलातर्फे मॉकड्रील
बँकेतील दरोडेखोर पोलिसांना शरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेंडी (ता. नगर) गावातील बँकेत बुधवारी सकाळी अचानक तीन हत्यारबंद इसमांनी प्रवेश केला. बँकेशेजारील दुकानदाराने तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला आणि सगळ्यांना सतर्क केले. 10 मिनिटांत गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी बँकेला घेराव घातला. पोलिसांनी दरोडेखोरांना आवाहन केले आणि दरोडेखोरांनी शरणागती पत्करली.

या प्रकारामुळे शेंडी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र संपूर्ण प्रसंगानंतर खुलासा झाला की एमआयडीसी पोलिसांनी मॉकड्रील करून आपत्कालीन परिस्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणा कशी कार्यान्वित करायची याचे सादरीकरण केले. ग्रामीण भागात वस्त्यांवर चोर्‍या दरोड्याचे प्रकार झाल्यावर आधुनिक तंत्रज्ञानातून सुरक्षा यंत्रणा कशी सक्रिय करायची यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असे मॉकड्रील विविध गावांत आयोजित करण्यात येत आहे.

त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होत आहे. याविषयी एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके, दत्तात्रय गोर्डे यांनी माहिती दिली. या मॉकड्रीलसाठी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, निरीक्षक कटके, सहायक निरीक्षक युवराज आठरे तसेच सर्व कर्मचार्‍यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com