बँक खात्यात धनादेशाची कमी रक्कम जमा

ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचा आदेश
बँक खात्यात धनादेशाची कमी रक्कम जमा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बँक खात्यात धनादेशाची कमी रक्कम जमा केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांना संयुक्तरित्या दूषित सेवा दिल्याबद्दल 25 हजार रुपये देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

राकेश रेवजी राऊत यांनी 14 मार्च 2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, केडगाव या बँकेचा धनादेश रुपये 87 हजार 500 रुपयांचा बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा चौपाटी कारंजा येथे जमा केला. परंतु, बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा यांच्या चुकीमुळे राऊत यांच्या खात्यावर फक्त 8 हजार 750 रुपयेच जमा झाले. राऊत यांनी खात्यात जमा न झालेले रुपये 78 हजार 750 रुपये परत मिळण्यासाठी बँकेकडे वारंवार तक्रारी केल्या.

मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी वकिलामार्फत बँकेला नोटीस दिली. त्यालाही कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राऊत यांनी नगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तेरा महिन्यांनी बँकेने त्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम 78 हजार 750 रुपये जमा केले. स्वतःच्या हक्काच्या रक्कमेपासून वंचित रहावे लागले.

त्यामुळे झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्राहक न्यायालयात केली. तर बँक ऑफ महाराष्ट्रने स्थानिक चेक वसुली चार्ज न घेता मोफत केली जाते. त्यामुळे तक्रारदार यांना दूषित सेवा दिली आहे. ही बाब लागू पडत नाही असा बचाव घेतला. तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे, तसेच राऊत यांचे वकील अ‍ॅड.हेमंत कराळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदार यांचा अर्ज मंजूर केला.

बँकेने सेवेत त्रुटी ठेवल्या असा निष्कर्ष ग्राहक आयोगाने पारित केला. बँक ऑफ महाराष्ट्रचे सहाय्यक महाव्यवस्थापक नगर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या चौपाटी कारंजा शाखेचे व्यवस्थापक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक यांनी वैयक्तिकरितीने अथवा संयुक्तपणे तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी 15 हजार रुपये, तक्रार अर्जाचा खर्च रुपये 10 हजार असे 25 हजार द्यावेत, असे आदेश दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com