अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर संतवीर वारकरी बंडातात्या कराडकर यांचे 100 युवकांसह व्यसनमुक्ती शिबिर संपन्न झाले.

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संतवीर वारकरी बंडातात्या कराडकर यांनी वयाच्या 69 व्या वर्षी न थकता व न बसता अडीच तासांत आपल्या 100 व्यसनमुक्त युवक सहकार्यांसोबत कळसुबाई शिखर सर केले.

प्रतिवर्षी महाराष्ट्रातील एका किल्ल्यावर व्यसनमुक्त युवक संघाचे युवक प्रतापी संस्कार शिबिर होत असते. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील युवक या शिबिरात सहभागी होतात व व्यसनमुक्तीचा संकल्प करतात.

गुरुवर्य तात्यांच्या मार्गदर्शनाने व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक हे ब्रीद घेऊन वारकरी विचार अंगीकारून जीवन जगतात. हे या शिबिराचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिबिर झाले नाही. तात्यांना ऐतिहासिक ठिकाणे, गड, किल्ले यांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. बंडातात्या कराडकर हे कोल्यातून मुंबईकडे जात असताना नेहमी कळसुबाई शिखर त्यांना साद घालत होते, म्हणून आपला अपूर्ण राहिलेल्या संकल्प हा कळसुबाई शिखर सर करून त्यांनी पूर्ण केला. या शिबिरासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून युवक आले होते.

रात्री चितळवेढे गावात माऊली आरोटे यांच्याकडे मुक्काम करून सकाळी पाच वाजता निघून सकाळी सहा वाजता बारी गावातून प्रार्थना करून चढाईला सुरुवात केली. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसुबाई माता की जय, अगस्ती महाराज की जय अशा घोषणांचा निनाद करत वारकरी पताका घेऊन तात्यांनी व सहकार्यांनी कळसुबाई शिखर सर केले.

9 वर्षांपासून ते 74 वर्षापर्यंत या वयोगटातील तरुण सहभागी झाले होते. शिखरावरचे निसर्गरम्य परिसर व वातावरण पाहून खूप समाधान व आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पाणी व निसर्गाची मोठी देन अकोल्याला लाभली आहे अशी भावना व्यक्त केली.

मात्र पर्यटक वर येताना शिखरावर कचरा करतात हे पाहून खेद व्यक्त करत, प्रत्येकाने आपली रिकामी पाण्याची बाटली व सोबत दिसेल तो कचरा खाली आणण्याचा संकल्प करून रस्त्यात भेटलेल्या प्रत्येक पर्यटकांना देखील प्रबोधन करून कचरा न करण्याची विनंती केली. पुढच्या वर्षी हरिश्चंद्रगडावर सहल करण्याचा संकल्प यावेळी त्यांनी केला.

माची जवळ येऊन भोजन प्रसाद घेऊन मोहिमेचा समारोप केला. दोन वेळा मिष्टान्न भोजनाची व्यवस्था संतसेवक माऊली आरोटे यांनी केली व विशेष परिश्रम घेऊन हा संकल्प पूर्ण केला त्याबद्दल तात्यांनी माऊलींचे विशेष कौतुक केले.