टाकळीभान येथे दोन दिवसांपासून कडकडीत बंद

रुग्णांना धीर देण्यासाठी उपसरपंचाची पायपीट
टाकळीभान येथे दोन दिवसांपासून कडकडीत बंद

टाकळीभान (वार्ताहर) - टाकळीभान येथे करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वपक्षियांच्या बैठकित 7 दिवसांचा लॉकडाऊन घेण्याचा निर्णय झाल्याने काल दुसर्‍या दिवशी बाजारपेठ कडकडीत बंद होती. बंद कालावधीत करोना हॉटस्पॉट ठरलेल्या वाडगाव रस्ता व बेलपिंपळगाव रस्त्याच्या करोनाबाधीत रुग्णांच्या घरापर्यंत जावून त्यांना धीर देण्यासाठी उपसरपंच कान्हा खंडागळे पायपीट करताना दिसत आहेत.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसिकरणासाठी तालुक्यातील नागरीकांची होणारी गर्दी व नागरीकांचा निष्काळजीपणा यामुळे टाकळीभान येथे करोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासुन चांगलीच वाढली आहे. आजही 50 पेक्षा जास्त रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत तर गेल्या महीनाभरात सुमारे 6 रुग्णांचा करोनाने बळी घेतला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामसचिवालयात सर्व पक्षियांची बैठक घेऊन सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊनच्या कालच्या दुसर्‍या दिवशी सर्व व्यवसायीकांनी व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिल्यामुळे टाकळीभान कडकडीत बंद होते.

येथील करोना हॉटस्पॉट ठरलेल्या टाकळीभान मुठेवाडगाव रस्ता व टाकळीभान बेलपिंपळगाव रस्ता बैठकित हॉटस्पॉट ठरवून या परीसरात फिरण्यास मज्जाव करणारे फलक लावण्यात आले आहेत. या परीसरातील करोना रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचापूस करुन धीर देण्यासाठी उपसरपंच कान्होबा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव व सदस्य मंडळ सध्या पायपिट करीत आहेत. कुटुंबात संशयित करोना रुग्ण आसल्यास किंवा कुटुंबातील कोणाला काही त्रास होत असल्यास ते लपवून न ठेवता तपासणी करण्याचे आवाहन केले जात आहे. ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कुलच्या इमारतीत विलगीकरण कक्ष सुरु करण्यासाठी नियोजन सुरु असून सौम्य लक्षणे आसणार्‍या रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल केले जाणार असून सर्व सुविधा उपलब्ध करुन देणार आसल्याची माहीती खंडागळे व जाधव यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com