संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी व कर्जत येथे ऑक्सिजन प्रकल्प

ना.बाळासाहेब थोरात : ससून, घाटीच्या धर्तीवर नगरला मोठे रुग्णालय उभारण्याचा मानस
संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी व कर्जत येथे ऑक्सिजन प्रकल्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात कडक निर्बंध घालून दिलेले असले तरी, काही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. लोक रस्त्यावर दिसत आहेत. कायदा मोडणार्‍यांची गय करू नका. करोना उपचारासाठी आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी व कर्जत येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार असून पुण्याच्या ससून आणि औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर नगरमध्ये मोठे रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या.

जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी थोरात यांनी शनिवारी प्रशासकीय आणि आरोग्य अधिकार्‍यांची बैठक घेतली व अधिकार्‍यांना सूचना केल्या. यावेळी मंत्री थोरात यांनी जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बाधित रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करण्याची कार्यवाही करावी. सर्व रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन केले पाहिजे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लक्षणे असणार्‍यांचे विलगीकरण करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. संगमनेरमध्ये याचा चांगला परिणाम झाला, बाधितांची संख्या घटते आहे. बाधित रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यास केवळ औषधोपचारावर रुग्ण बरा होऊ शकतो. रूग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शनची गरज पडत नाही, असे त्यांनी सांगीतले.

जिल्हा नियोजन मंडळातून नगरचे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कर्जत, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर येथे दररोज 250 जम्बो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याला ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होईल. जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून 100 पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना पुरवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

नगर महापालिका हद्दीत रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यादृष्टीने निर्बंध अधिक कडक करणे अत्यावश्यक आहे. कोविड केअर सेंटरमधील सुविधा वाढविण्यावर भर द्या. उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा. या संकटातून बोध घेऊन पुण्यातील ससून किंवा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर शहरात मोठे आरोग्य केंद्र उभारण्याच्या संदर्भाने अभ्यास करून जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश थोरात यांनी दिले.

जिल्ह्यात तसेत राज्यात लसीकरण मोहिम राबविली जात आहे. राज्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन दिल्यास वेगाने लसीकरण करु शकतो. मात्र, केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लस सध्या येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि राज्याची सध्याची मागणी व गरज यामध्ये तफावत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक रेमडेसिवीरची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

करोनामध्ये मतभेद येता कामा नये

करोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असून यामध्ये कोणत्याही स्वरुपाचे मतभेद येता कामा नयेत. सर्वच लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, प्रशासन यांनी हातात हात घालून या करोना विरुध्दची लढाई जिंकली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यातच ऑक्सिजन उपलब्धतेबाबत अडचणी होत्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न युद्धस्तरावर सुरु आहे. जिल्ह्यासाठी मिळेल तिथून पुरेशा प्रमाणात आपल्याला लागणारा ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील काही प्लान्टमधून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील काळात अडचणी कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच एमआयडीसीतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन तेथे महसूलमंत्री थोरात यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून दैनंदिन 5 टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याने आता काहीसा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष शेळके यांची सांत्वनपर भेट

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी प्रताप शेळके आणि त्यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com