अखेर बाळासाहेब थोरातांनी मौन सोडलं; म्हणाले, “जे राजकारण झालं…”

अखेर बाळासाहेब थोरातांनी मौन सोडलं; म्हणाले, “जे राजकारण झालं…”

संगमनेर | प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. दरम्यान, या प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं. तब्बल महिन्याभरानंतर त्यांनी थेट मुंबईतून याबाबत भाष्य केलं.

थोरात म्हणाले, मी गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात होतो. माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कार्यकर्त्यांपासून लांब रहावं लागलंय. आम्ही संघर्षातून नेहमीच यश मिळवलंय. नाशिक विधानसभा मतदासंघातून अपक्ष निवडणूक लढवून सत्यजित तांबे चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. गेल्या महिनाभरात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. त्या सर्व घडामोडींचं काही जण चुकीच्या पध्दतीनं राजकारण घडवून आणत होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, मी माझ्या भावना काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर बोलू नये या मताचा मी कायम आहे. त्यामुळे त्या बाबतीत जे काही आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. पक्ष आणि माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ. जे काही करायचे ते योग्य करू. आपण काही काळजी करू नका. काॅंग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळात अशा काही बातम्या आल्या की, आपल्याला पार भाजपपर्यंत नेऊन पोहचवले. भाजपच्या तिकीटाचे वाटपही त्यांनी करुन टाकल्या. काही लोकांनी गैरसमज पसरवला. ते कशा पद्धतीने गैरसमज करतात हे पाहीले अनेक चर्चाही त्यांनी घडवून आणल्या, असही ते म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com