आपत्कालीन परिस्थितीत सर्वांचे सहकार्य अपेक्षित

आपत्कालीन परिस्थितीत सर्वांचे सहकार्य अपेक्षित

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : शेवगाव येथे करोनाविषयक आढावा बैठक

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

देशात करोना बाधित रुग्णांसाठी लागणार्‍या ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा प्रश्न गंभीर असल्याने राज्यातही त्याचे पडसाद उमटत आहेत. मात्र त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीन परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार यांनी समन्वय ठेवून काम करणे आवश्यक आहे. राज्य सरकार व सर्वच विभाग या स्थितीत व्यवस्थित काम करीत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. शेवगाव येथे करोनाविषयक आढावा बैठकीत महसूलमंत्री थोरात बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आ. सुधीर तांबे, माजी आ. चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, नायब तहसीलदार मयूर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, डॉ. मेधा कांबळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटकेर उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, करोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे नागरिक व व्यावसायिकांनी शिस्त पाळल्यास ती हळूहळू कमी होईल. स्थलांतरीत व्यक्तींमुळे संसर्ग वाढतो. त्यामुळे बाहेरच्या शहरातून, जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करणे, रुग्णसंख्येच्या प्रमाणात बेड संख्या उपलब्ध होण्यासाठी कोव्हिड सेंटरची संख्या व क्षमता वाढवावी. योग्य उपचार, शारिरीक व मानसिक सुदृढता यामुळे करोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता लसीकरण, लक्षणे आढळल्यास चाचण्या करून त्यानुषंगाने उपचारावर भर द्यावा. आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रंदिवस काम करत असल्याने त्यांना समजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी शेवगाव, बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयास बेडची संख्या वाढविण्याची, तालुक्यासाठी ऑक्सिजन व रेमडेसिवीर आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत. भविष्यातील ऑक्सिजन समस्या सुटण्यासाठी तालुक्यात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात यावा, अशी मागणी केली. बोधेगाव येथील आरोग्य सुविधांसाठी अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक माधव काटे व शरद सोनवणे यांनी मंत्री थोरात यांना निवेदन दिले.

आढावा बैठकीच्या इफेक्टकडे लागले लक्ष

या आढावा बैठकीतून तालुक्यातील करोना रुग्णांसाठी अत्यावश्यक बनलेली रेमडेसिवीरसारखी औषधे, ऑक्सिजन, करोना प्रतिबंधक लस तुटवडा आदी प्रश्न सुटून रुग्ण व नातेवाईकांची पळापळ व दमछाक कमी होईल का? याकडे आता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com