नाहटांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादीला फायदा होणार ?

सोयीच्या राजकारणाने श्रीगोंद्यातील कार्यकर्ते नाराज
नाहटांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादीला फायदा होणार ?

श्रीगोंदा | Shrigonda

तालुक्यात ‘बाळासाहेब नाहटा आणि हजाराच्या नोटा’ ही म्हण प्रचलित आहे. याला कारण आहे. राजकारण करताना फारसे जनमत नसले तरी काही तरी देण्याचे नियोजन करून, खेळी करून निवडणुकीत विजय मिळवण्याचे तंत्र बाळासाहेब नाहटा यांनी प्रचलीत केले. मात्र यातून सर्वांनाच त्यांचा संधीसाधूपणा माहिती झाल्याने आता जनसामन्य सावध झाले आहेत. संधी साधत पक्ष व नेता बदलणार्‍या बाळासाहेब नाहाटा यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. नहाटांचा प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी किती फायद्याचा असणार हा प्रश्नच आहे. मात्र यातून नहाटा काय संधी साधून घेणार याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे.

तालुक्यातील तसेच जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी आमदार राहुल जगताप आणि घनश्याम शेलार यांची राजकीय ताकत मोठी आहे. यामुळे ते असताना नाहटा काय जादू करणार हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. उलट या प्रवेशाने राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. याबाबत ते खंत व्यक्त करताना दिसत आहेत.

कधीकाळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा हात धरत राजकारणात प्रवेश करणारे नाहटा काल पर्वापर्यंत त्यांचे खंदे समर्थक होते. पाचपुतेंनी त्यांना बाजार समिती अध्यक्ष केले. मात्र कायमच ‘याला धर त्याला सोड’ अशी नीती असलेले नाहटा यांनी पाचपुते यांची साथ सोडली. कधी पाचपुते, कधी माजी आमदार राहूल जगताप तर कधी राजेंद्र नागवडे. एकदा राष्ट्रीय जनता पक्षातही ते जाऊन आले. तर लोकसभेवेळी थेट खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वळचणीला जाणारे बाळासाहेब नाहटा यांनी जसे सरकार बदलले तसे आपले राजकिय फासे बदलत संधी साधुन घेतल्याचा इतिहास श्रीगोंदेकरांना माहित आहे.

मागील सहा महिन्यापूर्वी झालेल्या राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्षपद नहाटा यांना मिळण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाहटा यांना मदत केली. नहाटांचा इतिहास माहित असल्याने तेव्हाही याची तालुक्यात मोठी चर्चा झाली होती. या उपकारांची उतराई होण्यासाठी नहाटांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असेल असे बोलले जात आहे. परंतु यावेळी नेमके उलटे झाले आहे. राज्यात नुकतेच सत्ताधारी झालेल्या विखेंच्या गटाला सोडत सत्ता गेलेल्या राष्ट्रवादीत प्रवेश करून नहाटा काय साधणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

बाजार समिती महासंघांचे पद नहाटांकडे असले तरी तालुक्याच्या राजकारणात नागवडे, जगताप, शेलार, पाचपुते यांच्याशिवाय पान देखील हालत नसल्याने नाहटा हे कायम दुसर्‍या फळीतील नेते राहिले व आताही राहणार आहेत. जिथे फायदा तिकडे नाहटा असे समीकरण राहिले आहे. याशिवाय बनावट टीडीआर घोटाळा प्रकरणात त्यांचे नाव आलेले आहे. श्रीगोंदा बाजार समिती अध्यक्ष, एकदा पंचायत समिती सदस्य वगळता अनेक वेळा अपयश देखील आलेले असताना राष्ट्रवादी मध्ये नाहटांना प्रवेश दिल्याने तालुक्यातील राजकारण फारसे बदलेल असे दिसत नसल्याचे जानकार सांगत आहेत. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील नाहटा चा प्रभाव असेल असे गट, गण नसल्याने केवळ दाम करी काम याच नियोजनाच्या जोरावर निवडणूक करणारे नाहटा राष्ट्रवादीला कितपत फायदा मिळवून देतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com