भाजपा व सेनेच्या शिंदे गटामुळेच ओबीसींना आरक्षण - गाडेकर

बाळासाहेब गाडेकर
बाळासाहेब गाडेकर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

भाजपा व शिवसेनेचा शिंदे गट यांच्या मुळेच ओबीसींना आरक्षण मिळाले असल्याचा दावा भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काशिनाथ गाडेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे अडीच वर्षे ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणापासून वंचित राहावे लागल. परंतु महाराष्ट्रात भाजपा व शिवसेना शिंदे गट यांचे सरकार येताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींची बाजू मांडली.

परंतु विशेष करून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसींना आरक्षण नको होते, म्हणून त्यांनी बाटिया आयोग नको म्हणून महाराष्ट्रात बोंबाबोंब चालू केली. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करून सुप्रीम कोर्टाने ओबीसींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला व स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना राजकीय आरक्षण दिले. म्हणून सुप्रीम कोर्टाचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओबीसींचे कैवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत गाडेकर म्हणाले, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर गेले दोन वर्षे आंदोलने केली मोर्चे काढले, रास्ता रोको केला.

तसेच मंत्रालयावर दोन ते तीन वेळेस बोंबाबोंब आंदोलन केले. या आरक्षणामध्ये आमचे नेते भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच या संघर्षामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, प्रभारी मनोज ब्राह्मणकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे यांनी खंबीरपणे ओबीसींच्या पाठीमागे उभे राहून आंदोलनाला साथ दिली, असे बाळासाहेब गाडेकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com