बालमटाकळीत महामार्गावर शेतकर्‍यांचे रास्तारोको आंदोलन

अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने संतप्त
बालमटाकळीत महामार्गावर शेतकर्‍यांचे रास्तारोको आंदोलन

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी बालमटाकळी येथे शेवगाव- गेवराई राज्यमार्गावर संतप्त शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. लेखी आश्वासन दिल्यानंतर पुकारलेले आंदोलन दोन तासांनी मागे घेण्यात आले.

शेवगाव तालुक्यात पूर्व भागातील बालमटाकळी -बोधेगाव परिसरात गेल्या दीड महिनाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे शेत जमिनीत वेळोवेळी पाणी साचल्याने शेतातील खरीप हंगामातील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या तोंडातील घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे, नुकसानग्रस्त पिकाचे सरसकट पंचनामे करून मराठवाड्याच्या धर्तीवर हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना तातडीने देण्यात यावी, इ-पीक पाहणी शेतकर्‍यांच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे.

त्यामध्ये सवलत द्यावी, शेवगाव -गेवराई राज्यमार्ग, बालमटाकळी- कांबी जोडणार्‍या रस्त्यावरील पूल जोरदार अतिवृष्टीमुळे पाण्याने वाहून गेले आहेत याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या संतप्त शेतकर्‍यांनी यावेळी केल्या. बोधेगावचे मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे, तलाठी बाबासाहेब अंधारे, यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे अश्वासन दिले त्यानंतर पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले

यावेळी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बडधे, मरकड, ढाकणे, गायकवाड यांनी चोक बंदोबस्त ठेवला यावेळी राज्यमार्गावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या आंदोलनात बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुरे, बप्पासाहेब पारनेरे, राजेंद्र ढमढेरे, उपसरपंच तुषार वैद्य, मोहनराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत गरड, विक्रम बारवकर, नामदेव कसाळ, हरी फाटे,संजय वडते, हरिश्चंद्र घाडगे, यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मंडलाधिकार्‍यांवर रोष

आंदोलनाच्या वेळी बोधेगावचे मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे उशिरा आल्याने आंदोलक संतप्त होऊन अनेकांनी त्यांना मुख्यालयात येत नाहीत जनतेची अडचण होते यावरून त्यांना धारेवर धरले गेले.

Related Stories

No stories found.