बाळ बोठेची रवानगी नाशिक कारागृहात

पारनेर उपकारागृहातून नाशिक, औरंगाबादला 20 कैद्यांची रवानगी
बाळ बोठेची रवानगी नाशिक कारागृहात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर येथील उपकारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या झाल्यामुळे 20 कैद्यांची रवानगी प्रत्येकी 10 याप्रमाणे नाशिक आणि औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यामध्ये रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले असल्याचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले.

पारनेर उपकारागृहाची 24 कैद्यांची क्षमता आहे. मात्र प्रत्येक्षात याठिकाणी 70 कैदी ठेवण्यात आले होते. हे प्रमाण जास्त झाल्याने जुन्या गुन्ह्यातील कैदी अन्य ठिकाणी रवाना करण्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानुसार औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात 10 तर नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात 10 असे 20 कैद्यांची रवानगी करण्यात आली आहे. तरीही याठिकाणी सुमारे 50 कैदी असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले.

दरम्यान रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बाळ बोठे कारागृहात आहे. त्याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्याला उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. तसेच कोतवाली पोलिसांत दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील त्याला उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. आता त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.