बोठेला कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात

नगर न्यायालयात आज हजर करणार
बोठेला कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत गुरूवारी संपली.

त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बोठे याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान त्याच्यावर नगर कोतवाली पोलीस ठाण्यात यापूर्वीच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असल्याने त्याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बोठेला आज (शुक्रवार) नगरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बोठेला हैदराबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरूवारी कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला पारनेरच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी न्यायालयीन कोठडी दिली. यावेळी सरकारी वकील मनीषा दुबे व आरोपीच्या वतीने संकेत ठाणगे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, यावेळी बोठेच्या वतीने वकील ठाणगे यांनी न्यायालयापुढे दिलेल्या अर्जात बोठे याला चेकबुकवर सह्या करण्याची परवानगी मागितली.

तसेच बोठे याने पत्रकारितेच्या काळात घोटाळे बाहेर काढलेले आरोपी नगरच्या सबजेल व येरवडा कारागृहात असल्याने मला तिथे ठेवल्यास माझ्या जिवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी न ठेवता नाशिकच्या कारागृहात ठेवावे, अशी मागणी बोठेच्यावतीने ठाणगे यांनी केली आहे.

मात्र, यावर गुरूवारी निर्णय झाला नाही. त्यातच नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याने त्याचा ताबा कोतवाली पोलिसांनी घेतला आहे. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर हे बोठेला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात हजर होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com