
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने मौन सोडताच तपासाला वेग आला आहे. हत्याकांडाबाबत माहिती देण्यास त्याने सुरुवात केली असून,
हत्या का केली, कसा कट रचला, रसद कशी पोहचली, याबाबत लवकरच उलगडा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेच्या अनुषंगाने ज्याठिकाणी बोठेचा संबंध आला त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तात बोठेला सोबत घेऊन तपासणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी बोठेला बेड्या घालून फिरवत स्थळपाहणी पंचनामा केला.
30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची हत्या झाली. जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार बोठे हाच असल्याचे पोलीस तपासात समोर आले. बोठे गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी त्याला हैदराबादमध्ये अटक केली.
सध्या बोठे पोलीस कोठडीत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्याकडे चौकशी करत आहेत. सुरूवातीला बोठे याने चौकशीत प्रतिसाद दिला नसल्याची बाब समोर आली होती. परंतु, आता बोठे याने मौन सोडले असून घटनेचा उलगडा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घटनेच्या अनुषंगाने बोठेचा ज्याठिकाणी संबंध आला त्या स्थळांवर पोलिसांनी त्याला गुरूवारी फिरवले. बोठे राहत असलेल्या घरी व त्या परिसरात, तो पूर्वी काम करत असलेल्या वर्तमानपत्राच्या कार्यालय आदी ठिकाणी स्थळपाहणी केली. त्याठिकाणचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
दरम्यान रेखा जरे यांची हत्या कोणत्या कारणातून केली, यासह अन्य गोष्टी पोलीस तपासात समोर येत आहे. पोलिसांनी त्याविषयी गोपनियता बाळगली आहे. बोठेने हत्येविषयी मौन सोडल्याने तपासात गती आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तर ‘तो’ मोबाईल कंपनीकडे पाठविणार
हत्येनंतर बोठे फरार झाल्याने त्याने त्याचा मोबाईल घरी ठेवला होता. घर झडतीमध्ये पोलिसांनी तो जप्त केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यातून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र, मोबाईलचा लॉक उघडण्यास पोलिसांना अपयश आले आहे. त्यासाठी पोलीस मुंबई सायबर सेलची मदत घेत आहे. तिथे लॉक न उघडण्यास तो मोबाईल कंपनीकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.