बोठेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

आज करणार न्यायालयात हजर
बोठेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलेल्या बाळ बोठे याची शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मात्र, तोफखाना पोलीस ठाण्यात बोठे याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याने त्याला खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. बोठे याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शहरातील एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी बोठे याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपली असता त्याला काल नगरच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे समोर आले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचवेळी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून बोठेचा शोध पोलीस घेत होते.

पोलीसांच्या पथकाने बोठे याला हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरातून ताब्यात घेवून त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पारनेर न्यायालयाने त्याला 12 दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर बोठे याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. काल बोठेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

मात्र, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बोठेला वर्ग करावे, असे पत्र तोफखाना पोलिसांनी यापूर्वीच दिले होते. त्यानुसार बोठेला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला आज नगरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com