बक्तरपूर |वार्ताहर| Baktarpur

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे, शहरटाकळीे शिवारातील शेतजमिनीत जाण्यासाठी हक्काचा रस्ता तिस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रहदारीसाठी मोकळा झाला आहे.

अधिकृत व हक्काचा रस्ता जायकवाडी प्रकल्पात गेल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना संबंधित शेतकर्यांना करावा लागत होता. ढोरसडे येथील अनेक शेतकर्यांची प्रतीक्षा संपली असून हा रस्ता अखेर 13 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे रहदारीस मोकळा झाल्याची माहिती आबासाहेब राऊत यांनी दिली.

जायकवाडी प्रकल्पाकडे या शेत जमिनी असून या शेतजमिनीचा अधिकृत रस्ता प्रकल्प हद्दीत गेला व प्रकल्पात पाणी आल्यावर हा रस्ता पाण्याखाली जात असे त्यामुळे अनेक शेतकर्यांना जमिनीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने जमिनी पडीक ठेवण्याची वेळ अनेकदा आली होती.

इतर पर्यायी रस्ते खाजगी व योग्य नसल्याने मोठी अडचण या परिसरात निर्माण झाली होती. यावर अनेकदा तोडगा काढण्यासाठी चर्चा, मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते मात्र या अडचणीवर पर्याय सापडत नव्हता.

अशातच शेतकर्यांनी एकत्र येत दळणवळणाच्या या महत्त्वाच्या रस्त्यावर सखोल चर्चा व कायमचा तोडगा काढण्यासाठी चक्क जमीनच खरेदी करत रस्त्याचा वर्षानुवर्ष रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लावला. यासाठी रस्त्याची गरज असलेल्या शेतकर्यांनी आर्थिक रक्कम जमा करून अरुण वैद्य यांची एक एकर जमीन खरेदी केली व आबासाहेब निमसे यांनी बदली जमीन घेत रस्त्यासाठी आपली जमीन दिली.

रस्ता मोकळा करणे कामी समेट घडवण्यासाठी प्रगत शेतकरी आबासाहेब राऊत, सरपंच ज्ञानदेव निमसे, माजी चेअरमन बाबासाहेब खंबरे, पांडुरंग माळवदे, रामदास काळे यांनी पुढाकार घेतला व आजरोजी जमिनीतून रस्ता तयार असून तीस वर्षांपासून भिजत पडलेला शेतजमीन रस्ता प्रश्न मिटल्याने अखेर सर्व लाभधारक शेतकर्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यावेळी मुरलीधर निमसे, संजय राऊत, दादासाहेब खंबरे, निवृत्ती खंबरे, काकासाहेब काळे, सुभाष वाघमारे, गणेश खंबरे, भगवान काळे, दत्तात्रय शित्रे, दिलीप खंबरे, आबासाहेब निमसे, भाऊसाहेब शित्रे, अशोक राऊत, भावराव माळवदे, साहेबराव खंबरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

असा सुटला रस्ता प्रश्न

रस्ता प्रश्न सुटण्यासाठी जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आबासाहेब निमसे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत व 30 वर्षांपासून शेतकर्यांची अडचण लक्षात घेऊन पर्यायी जमीन घेत रस्त्यासाठी जमीन दिली. याठिकाणी 17 फूट रूंदीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यासाठी रस्त्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांनी पुढे स्वतःच्या जमिनीतून रस्ता तयार करून दिल्याने अनेक वर्षे रखडलेला रस्ता प्रश्न मार्गी लागून प्रलंबित प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी प्रगत शेतकरी आबासाहेब राऊत यांचे मोठे योगदान याकामी राहिले.