लस घेणार नाही म्हणजे नाही!

बहुजन मुक्ती पार्टीची आश्चर्यकारक भूमिका| २० डिसेंबरला सक्तीविरोधात आंदोलन
लस घेणार नाही म्हणजे नाही!

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोना प्रसार झाल्यानंतर नागरिकांना लसीची प्रतीक्षा होती. लस वेळेत न मिळाल्याने अनेक आरोप-प्रत्यारोप गोंधळ झाले. अलीकडे लस मुबलक आहे मात्र डोस घेण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शासनाने लसीकरण सक्तीचे करण्याकडे वाटचाल केली आहे.

मात्र, या सक्तीलाही आता विरोध होत आहे. राज्यातील ग्रामीण भागात अनेकांनी लस घेणे टाळले आहे. लस घेणार नाही म्हणजे घेणार नाही' अशी त्यांची भूमिका आहे. नेमका हाच कित्ता गिरवत बहुजन मुक्ती पार्टीने राज्यभरात लसीकरणाच्या सक्तीला विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी २० डिसेंबर रोजी आंदोलन केले जाणार आहे. तत्पूर्वी लसीकरणाला जाहीर विरोध हा चर्चेचा मुद्दा झाला आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनाला संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांनी ते स्वीकारले. यावेळी जिल्हाध्यक्ष समीर शिंदे, जिल्हा प्रभारी राजेंद्र करंदीकर, शहराध्यक्ष शिवाजी भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष संजय सावंत, पारनेर तालुकाध्यक्ष अय्युब शेख, महिला आघाडी अध्यक्षा अॅड. मोनिकाताई सोनवणे, बहुजन क्रांती मोर्चाचे गणेश चव्हाण, डॉ. भास्कर रणनवरे, नगर तालुकाध्यक्ष सुधीर खरात, अक्षय जाधव, कन्हैया इट्टम, अविनाश देशमुख, नाना वालुंज आदी उपस्थित.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास कोविड लसीची सक्ती करता येणार नसल्याचे ॲफीड्यूट लिहून दिले आहे. तसेच मणिपूर, कर्नाटक, गुजरात, राजस्थान येथील उच्च न्यायालयाने लसीची सक्ती केली जाऊ शकत नाही असा निकाल दिला आहे. सक्ती करणे म्हणजे संविधान कलम क्र. १४, १९ व २१ चे उल्लंघन असल्याचे निकालात म्हटले आहे. तरी राज्यातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य विभागांना पत्र पाठवून लसीची सक्ती करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

लस न घेणाऱ्यांना शासकीय मूलभूत योजना देण्याचे बंद करण्यात आले आहे. प्रवास करणे, शाळा-महाविद्यालात येणे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश व प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकदिवसीय निदर्शने केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. सोमवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com