बहुजन मंडळाचे शिक्षक बँकेसमोर आंदोलन

लॉकडाऊनच्या काळात 30 लाख प्रवास भत्ता लाटल्याचा आरोप
बहुजन मंडळाचे शिक्षक बँकेसमोर आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधार्‍यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बँक कर्मचार्‍यांना पदोन्नत्या दिल्या आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही संचालकांनी 30 लाख रुपयांचा प्रवासभत्ता घेतला असल्याचा आरोप करत कोविडच्या काळात कर्जवितरण घोटाळा झाला आहे. सभासदांचा आरबीआयच्या नावाखाली 2019-20 चा लाभांश लपवला आहे. शिक्षक बँकेने बेहिशोबी घड्याळ खरेदी करून मोठा घोटाळा केला आहे. सभासदांच्या खिशातून पैसे काढून मनमानी पद्धतीने संचालक मंडळाचा कारभार सुरू आहे. बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ स्वतःचे खिसे भरण्यात मग्न असून सभासदांना फसवण्याचा सपाटा संचालक मंडळाकडून सुरू असल्याचा आरोप इब्टा प्रणित बहुजन मंडळाने करत शनिवारी बँकेसमोर धरणे धरत घंटानाद आंदोलन केले.

या आंदोलनात बहुजन शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे, इब्टाचे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ,राजेंद्र कडलग, सुहास पवार, अरुण मोकळ, रामभाऊ गवळी, रवी रुपवते, सतीश मुनतोंडे, विजय काटकर, भगवान लेंडे, अशोक नेवसे, नवनाथ अडसूळ, सुभाष भिंगारदिवे, अविनाश बोधक, सतीश जाधव, विलास गव्हाणे, अशोक देशमुख, सुभाष बगनर, मिलिंद खंडीझोड आदी उपस्थित होते. व्यवहारे म्हणाले, नगर प्राथमिक शिक्षक बँकेत विद्यमान सत्ताधारी (गुरुमाऊली दोन्ही गट) यांची तांत्रिकदृष्ट्या कार्यकाल संपला असतानाही करोनाची साथ मिळालेले सत्ताधारी सभासदांच्या डोक्यावर कर्ज कसे अशा प्रकारे काम करत आहेत.

करोना कालावधी असताना संचालक मंडळाने प्रवास भत्त्यावर वारेमाप खर्च करून बँकेची अर्थात सभासदांची लूट केल्याची भावना सभासदांमधून व्यक्त करण्यात येत आहे. बहुजन मंडळ(इब्टा) प्रमोशनच्या विरोधात नाहीच, पण निवडणुकीच्या दोन ते तीन महिने अगोदर प्रमोशन करण्याचा सत्ताधारी मंडळाचा नेमका काय हेतू होता हे समजले नाही. येत्या पंधरा दिवसांत बहुजन मंडळाच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बँकेच्या शाखा बंद करणार असा इशारा व्यवहारे यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com