
पारनेर |प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील बहिरोबावाडी येथे लिंगमाळ वस्ती परिसरात बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात एका बोकडाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.9) सांयकाळी घडली. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातारवण पसरले आहे.
ढवळपुरी येथील मेंढपाळ बबन तांबे हे लिंगमाळ परिसरातील भीमराव देठे पाटील यांच्या कांद्याच्या शेतात मेंढ्या चारत होते. सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने कळपावर हल्ला करत बोकडावर झडप घातली. मेंढपाळ बबन तांबे यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने काही अंतरावर बोकडाला सोडून धूम ठोकली. परंतु या हल्ल्यात बोकडाचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मेंढपाळ यांनी अनिल देठे पाटील यांना दिली असता त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकार्यांना याबाबत माहिती दिली. तसेच सदरील घटनेचा पंचनामा करून मेंढपाळ तांबे यांना नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. वनविभागाच्या वतीने वनपाल निलेश बडे यांनी मंगळवारी सकाळी तातडीने बहिरोबावाडी येथील घटनास्थळी धाव घेत झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. लवकरात लवकर संबंधित मेंढपाळाच्या बँक खात्यावर शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत वर्ग होईल असे सांगितले.
गेल्या वर्षभरापासून किन्ही, बहिरोबावाडी परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असून आतापर्यंत अनेक मेंढपाळांच्या शेळ्या, मेंढ्या व घोड्यांवर बिबट्याने हल्ले केलेले आहेत. यासंदर्भात वनविभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून पिंजरा लावण्याची मागणी देखील केलेली आहे. परंतु वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
- अनिल देठे पाटील