बहिरोबावाडीत पार पडला बैलाचा दशक्रिया

बहिरोबावाडीत पार पडला बैलाचा दशक्रिया

शेतकर्‍याची कृतज्ञता, कुटुंबातील सदस्याप्रमाणे दुखवटा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील बहिरोबावाडी येथील व्यवहारे कुटुंबियांनी मृत्यू झालेल्या आपल्या लाडक्या सोन्या नावाच्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी नातेवाईकांच्या उपस्थितीत केला आहे. त्यामुळे हे कुटुंब आणि सोन्या बैल सध्या चर्चेत आहेत.

केशव मनाजी व्यवहारे असे या शेतकर्‍याचे नाव आहे. कष्टकर्‍याने बैलाची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणार्‍या बैलाचा शेवट गोड केलाय. 4 महिन्याचे वासरू ते 32 वर्षांचा सहवासात सोन्या बैल व्यवहारे कुटुंबाचा सदस्य बनला. दहा दिवसांपूर्वी सोन्याचा वृद्धापकाळाने व्यवहारे कुटुंबियांच्या दावणीला मृत्यू झाला. यामुळे घरातील सदस्य गेल्या प्रमाणेच व्यव्हारे कुटुंबियांना दुःख झाले. त्यांनी दहा दिवसांचा दुखवटाही पाळला.

सोन्याची कृतज्ञता व्यक्त करत माणसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेवा विधी पार पाडतात त्याच प्रमाणे सोन्या बैलाच्या मृत्यूनंतर विधी पार पाडण्यात आला. गावासह नातेवाईकांना गोडधोड जेवणाची पंगत घालत हा कार्यक्रम पार पडला. या दशक्रियाविधी निमित्त रामायणाचार्य यशवंत महाराज थोरात यांचे प्रवचन झाले.या दशक्रिया विधीसाठी ज्ञानदेव लंके, पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत पठारे, जितेश सरडे, यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

16 वर्षे पंढरपूर वारी रथाचा मानकरी

व्यवहारे कुटुंबाने आपल्या बैलाचा पोटच्या मुलासारखा सांभाळ केला होता. 32 वर्षे या कुटुंबासोबत सोन्या बैलाने काबाड कष्ट केलेच. परंतु त्याचा रूबाब, गरीब स्वभाव व ताकद यामुळे सलग सोळा वर्षे पंढरपूर पायी दिंडी वारीतील पालखी रथाचा तो मानकरी ठरला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com