साईभक्तांनी गुरुवारी व रविवारी अनावश्यक गर्दी टाळावी - बगाटे

साईभक्तांनी गुरुवारी व रविवारी अनावश्यक गर्दी टाळावी - बगाटे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जेव्हा आपण श्रद्धेकडे जात असतो तेव्हा श्रद्धा व्यक्त करताना कुठल्याही प्रकारचा आततायीपणा करायला नको,

श्रद्धा आणि कर्तव्य महत्त्वाची असून आपले स्वास्थ्य असेल तर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आपणास पुन्हा पुन्हा येता येईल. त्यामुळे सर सलामत तो पगडी पचास असे म्हणत भाविकांनी दर्शनासाठी येताना दर्शनाची वेळ, गाईडलाईन्स नॉम्स नीट ध्यानात घ्यावे व गुरुवारी आणि रविवारी शिर्डीत अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले.

राज्य शासनाच्या निर्णयानंतर करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीचे साईमंदीर खुले करण्यात आले. साईबाबा संस्थानच्यावतीने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर परिसरात दर्शनरांगेत अत्यंत सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे भाविकांनी सांगितले असून अशीच व्यवस्था पुढे चालू ठेवली तर साईंचे मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य प्रत्येकाला लाभेल, असे मत परराज्यातील भक्तांनी व्यक्त केले.

दरम्यान यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे यांनी दैनिक सार्वमतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, प्रमाणित कार्यपद्धती प्रमाणे दिवसाला सहा हजार भाविकांचे दर्शनासाठी नियोजन केले होते, तथापि लोकांचे सहकार्य मिळाल्याने आणि दर्शन रांगेत संस्थानच्यावतीने मार्गक्रमणाची दिशा निश्चित केल्यामुळे बाबांच्या समाधीजवळ तसेच मुखदर्शनासाठी भक्तांना जास्त संतुष्टी मिळत आहे.

साई मंदिरात गेल्यानंतर साईबाबांचे दर्शन कमीत कमी पाच मिनिटे उभे राहून मन भरून बाबांकडे बघता येते. त्यामुळे त्या दर्शन रांगेत जो सहा हजार भाविकांचा आकडा होता त्यात वाढ होऊन आठ हजारांच्या जवळपास नेता येणे शक्य झाले आहे. त्यासाठी संस्थान प्रशासनाने सॅनिटायझरसाठी ठेवण्यात आलेली थांबवण्यात आलेली मधली वेळ जास्त माणसे वापरून कमी करण्यात आली आहे.

गुरुवार व रविवारी जास्त भाविकांची गर्दी होण्याचा शिर्डीचा पूर्व इतिहास आहे, त्यामुळे सर्व साईभक्तांना साईबाबा संस्थानच्यावतीने हात जोडून विनंती तसेच आवाहन करतो की या दोन दिवशी शिर्डीत येण्याची भाविकांची श्रद्धा जरी योग्य असली तरी तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन आरती, दर्शनाची वेळ, तारीख निश्चित करूनच शिर्डीला यावे.

तसे न करता आल्यास याठिकाणी गर्दी होईल आणि गर्दीमुळे संपूर्ण देशातून येणार्‍या भाविकांमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल. त्यानुषंगाने भाविकांनी गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com