
शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला असला तरीदेखील शिर्डीचे साईबाबा मंदिर 17 मार्चपासून बंद आहे.
त्यामुळे साई संस्थानच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. असे असले तरी साई संस्थानच्या सर्व कर्मचार्यांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान देण्यासाठी न्यायालयाची पूर्व परवानगी घेऊन दिवाळी गोड करण्याचा निर्णय साईसंस्थानने सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी घेतला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.
करोनाच्या महामारीत सेवा देणार्यांना 466 कर्मचार्यांना सप्टेंबर महिन्यापासून पूर्वीप्रमाणेच 40 टक्के वेतनवाढ दिली जाणार आहे. त्याचबरोबर दर्जा निश्चित न झालेल्या 598 कर्मचार्यांचे थकीत वेतन देणे, असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. सर्व कर्मचार्यांना वरीलप्रमाणे सानुग्रह अनुदान तसेच कंत्राटी कर्मचार्यांचे थकीत वेतन मिळणार असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.
साई संस्थानच्या या निर्णयामुळे वेतन विलंबामुळे हैराण झालेल्या कंत्राटी कामगारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून यानिमित्ताने संस्थानच्या कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार आहे. कर्मचार्यांनी संस्थान निर्णयाचे स्वागत केले आहे. तर शिर्डी शहर भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी साईसंस्थान कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे,या मागणीला यश आल्याने सर्व कर्मचार्यांनी श्री. गोंदकर यांचे आभार मानले.