राहाता पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची दुर्दशा

अनेक वर्षांपासून नवीन प्रस्ताव अडकला लालफितीत!
राहाता पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची दुर्दशा

बाळासाहेब सोनवणे

राहाता / Rahata - राहाता पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची अत्यंत दुर्दशा झाली असून अनेक वर्षापासून नवीन निवासस्थानाचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. ‘कोणी घर देता का घर’ म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

राहाता पोलीस स्टेशनला बदली होऊन आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना कुटुंबासमवेत राहण्यासाठी निवासस्थान उपलब्ध नसल्यामुळे भाडेतत्त्वावर घर शोधावे लागते. परिणामी अनेकांची गैरसोय होते. राहाता पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी यांना राहण्यासाठी 29 निवासस्थान व पोलीस अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र एक निवासस्थानाची व्यवस्था आहे. सदरचे बांधकाम हे सन 1914 मधील आहे. या बांधकामाला शंभर वर्षापेक्षा जास्त काळ झाल्याने निवासस्थान संपूर्ण जीर्ण झाले आहे.

राहाता पोलीस स्टेशनच्या मालकीची 69 गुंठे जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगर-मनमाड हायवेलगत आहे. या जागेची किंमत गगनाला भिडली आहे. 29 निवासस्थानापैकी फक्त तीन पोलीस कर्मचार्‍यांचे कुटुंब जीव मुठीत धरून राहतात. राहाता पोलीस स्टेशन हद्दीलगत शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची नेहमी वर्दळ असते. त्याचबरोबर काकडी विमानतळही राहाता लगतच आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो साईभक्त विमाने शिर्डीला येतात. त्यामुळे या ठिकाणी 24 तास पोलिसांना बंदोबस्तासाठी थांबावे लागते.

राहाता पोलीस स्टेशन हद्दीतील जागेत योग्य नियोजन करून पोलिसांना निवास्थान बांधले तर शंभर कुटुंब राहू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते. शिर्डी, काकडी या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलीस कुटुंबियांना या ठिकाणी राहण्यासाठी चांगली व्यवस्था होईल. निवासस्थान बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च लागणार आहे. आर्थिक तरतूद नाही म्हणून हा प्रस्ताव अनेक वर्षापासून लालफितीत अडकला आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी बोलून दाखवले.

परंतु एखाद्या खासगी बांधकाम व्यवसायिकांना या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स व पोलीस कर्मचार्‍यांना राहण्यासाठी निवासस्थान ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर दिले तर गृह खात्याचा खर्च वाचेल. याआधी अनेक खासगी व्यावसायिकांनी या संदर्भात पोलीस खात्याकडे पाठपुरावा केला होता. परंतु ‘सरकारी काम बारा महिने थांब’ याप्रमाणे अनेक वर्षापासून सिटी ऑफ द हार्ट समजली जाणारी राहाता पोलीस स्टेशनची जागा पोलीस कर्मचारी निवासस्थान होण्याची वाट पहात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com