
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महिला बचत गटांची चळवळ अधिक गतीमान करण्यासोबत बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना आर्थिक शिस्तीचे धडे मिळावेत, यासाठी प्रत्येक गावात ग्रामसंघाची बांधणी सुरू आहे. या ग्रामसंघात गावातील सर्व महिला बचत गटातील एका प्रतिनिधीचा समावेश करण्यात येणार असून त्यांच्या मार्फत आर्थिक गतिमानतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सक्रिय 18 हजार महिला बचत गट असून कोविडनंतर या बचत गटांचे अर्थकारण रुळावर येण्यास सुरूवात झाली आहे. आता प्रत्येक गावात तयार होणार्या ग्रामसंघाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना आर्थिक व्यवहारांची शिस्त लावण्यात येणार आहे. आर्थिक व्यव्हारात पारदर्शकता आणणे, सरकारकडून मिळणार्या निधीचा व्यवहार स्वतंत्र्य व योग्य राहण्यास मदत होईल. तसेच उत्पन्न व खर्चाचे मुल्यांकन, अंदाज पत्रावर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्याचसोबत अनावश्यक खर्चावर निर्बंध आणण्यास मदत होणार आहे.
महिला बचत गटांना नियमित कर्ज पुरवठा, नियमित कर्जफेडीसाठी मार्गदर्शन, व्यवहारात अधिक अधिक रक्कम देणे टाळणे, उत्पादित वस्तूंची विक्री करून त्यातून जास्तीजास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याच ग्रामसंघाची मदत होणार आहे. यासाठी प्रत्येक गावात बचत गटांचे ग्रामसंघ स्थापन करून त्याव्दारे महिला बचत गटांना मदत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 18 हजार सक्रिय बचत गट असून त्यातील एका प्रतिनिधीचा त्यात्या गावातील ग्रामसंघात समावेश राहणार आहे.
असे आहेत तालुकानिहाय बचत गट
अकोले 1 हजार 756, जामखेड 943, कर्जत 1 हजार 80, कोपरगाव 1 हजार 320, नगर 1 हजार 677, नेवासा 1 हजार 229, पारनेर 826, पाथर्डी 1 हजार 447, राहाता 1 हजार 250, राहुरी 1 हजार 422, संगमनेर 1 हजार 727, शेवगाव 1 हजार 52, श्रीगोंदा 1 हजार 203, श्रीरामपूर 1 हजार 71 असे आहे.
पाच महिन्यांपासून पगारापासून वंचित
महिला बचत गटांना प्रोसाहित आणि मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात 750 सुमदाय संरसाधन व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्हा ग्रामविकास यंत्रणे मार्फत या व्यक्तींना महिन्यांला अवघे 3 हजार रुपये पगार देण्यात येतो. मात्र, जानेवारीपासून 750 कर्मचार्यांना पगार दिलेला नाही. यामुळे या सुमदाय संसाधन व्यक्तीमधून संताप व्यक्त होत आहे.