बाभुळगाव गंगा शिवारातील वाळू लिलावाच्या नियमांची पायमल्ली

पोकलेनच्या साह्याने रात्री वाळूउपसा, नागरिक उपोषणाच्या तयारीत
बाभुळगाव गंगा शिवारातील वाळू लिलावाच्या नियमांची पायमल्ली

नाऊर |वार्ताहर| Naur

वैजापूर-बाभुळगाव गंगा शिवारात झालेल्या वाळू लिलावाचे सर्व नियम ठेकेदाराने धाब्यावर बसवले असुन जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी वाळू उत्खनन करण्यात येत आहे. तालुक्यातील दोन नद्यांच्या वाळू घाटाचा लिलाव प्रक्रिया मागील महिन्यात पार पडला. यामध्ये गोदावरी व शिवना नदीचा समावेश आहे. या लिलाव प्रक्रियेमध्ये प्रशासनाला 1 कोटींचा महसूल अपेक्षित होता. परंतु ठेकेदारांच्या एकमेकाच्या जिरवा-जिरवीत तब्बल 8 कोटी 19 लाख इतका अतिरिक्त महसूल मिळाला.

एक मार्चपासून या उत्खननाला सुरुवात झाली. मात्र या उत्खननातुन एक गंभीर बाब समोर आली असून वाळू लिलाव प्रक्रियेच्या नियमानुसार झालेल्या घाटामधून ठरवुन दिलेल्या मापाएवढा वाळू उपसा ट्रॅक्टरव्दारे मजुरांच्या साहाय्याने हद्दीच्या बाहेर टाकुन तेथुन वाहतूक करणे असा नियम आहे. शिवाय सकाळी 6 ते सुर्यास्तच्या आत सांय 6 पर्यंत असा असला तरी हे नियम धाब्यावर बसवून बाभुळगाव गगा येथे गोदावरी नदीच्या पात्रात चक्क पोकलेनच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी ठेकेदारांनी वाळू उपसा सुरू केला आहे.

यंत्र वापरण्याची परवानगी नसताना तब्बल 4 ते 5 पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा होतआहे. या नियमबाह्य उत्खननाला गावकर्‍यांनी विरोध दर्शविला असला तरी यंत्राव्दारे होणार्‍या नियमबाह्य उत्खनानाला अलिखित परवानगी दिली कोणी, असा सवाल निर्माण होत आहे. या प्रकारचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असुन प्रशासनाने या ठिकाणी तलाठी पुनम खिलारे यांच्या बदली पलीकडे काही कारवाई करण्याची तसदी अद्याप घेतली नाही.

बाभुळगांव गंगा शिवारातील गोदावरी पात्र हे नगर व औरंगाबादच्या सीमा रेषेत येत असुन दोन्ही तालुक्याच्या प्रशासकिय अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष ताबा देणे गरजेचे असते. या अनुषंगाने वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, बाभुळगाव गंगा येथील नदीपात्रातून रात्रीच्या वेळी पोकलेन, डंपरच्या साहयाने अमाप उपसा केला जात असुन पात्रालगत असलेल्या 5 ते 6 एकर शेतीमध्ये हा लाखो ब्रासचा स्टॉक केला जात आहे. या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्ते नदीपात्रात उपोषण करणार असल्याचे समजते.

श्रीरामपूर व वैजापूर हद्दीसंदर्भात श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले कि, यापूर्वी मातुलठाण येथील लिलावाचा ताबा देताना दोन्ही तालुक्याचे तहसिलदार यांनी संयुक्तपणे हद्द निश्चित केली होती. मात्र बाभुळगाव गंगा शिवारातील लिलावासंदर्भात वैजापूर महसुल विभागाकडून कुठलाही पत्रव्यवहार किंवा संपर्क केलेला नाही. त्यांनी ताबा कशा पद्धतीने दिला याची कल्पना नसल्याचे तहसिलदार पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com