बाभळेश्वरवरून वाहतूक श्रीरामपूर मार्गे वळवू नये

अन्यथा या निर्णयाविरुध्द उद्यापासूनच उपोषण - आ. कानडे
आ. कानडे
आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीच्यानिमित्ताने तेथील वाहतूक बाभळेश्वरवरून श्रीरामपूर शहरातून वळविण्याचा निर्णय झाला आहे. मात्र यामुळे श्रीरामपूर शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सदरची वाहतूक पूर्वीप्रमाणेच बाभळेश्वरवरूनच करावी. सदरची वाहतूक श्रीरामपूर शहर व बेलापुरात काढण्यात येऊ नये अन्यथा या निर्णयाविरुध्द उपोषणाचा अवलंब करावा लागेल , असा इशारा आ. लहू कानडे यांनी दिला आहे.

आ. लहू कानडे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. या निवेदनात आ. कानडे यांनी म्हटले आहे की, बाभळेश्वर कडून जाणारी ट्रॅफिक श्रीरामपूर नेवासा रोडने टाकळीभानवरून जाणे अपेक्षित होते. परंतु सदरची वाहतूक आज प्रत्यक्षात श्रीरामपूर शहरातून बेलापूर मार्गे देवळालीवरून जात आहे. श्रीरामपूर-बेलापूर- देवळाली रस्ता किंवा कोल्हार-उक्कलगाव- बेलापूर-देवळाली रस्ता हेवी व्हेईकल त्यावरून चालू शकतील अशा क्षमतेचे बांधलेले नाहीत.

तथापि स्थानिक अधिकार्‍यांनी व आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांनी संगनमत करुन हेवी व्हेईकल वाहतूकदारांना आर्थिक लाभापोटी शॉर्टकट उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नव्यानेच तयार करण्यात आलेला सदरचा रस्ता नादुरुस्त होऊन कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सदरची वाहतूक तात्काळ बंद करुन संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती आहे.

अशीच या मार्गाने वाहतूक सुरू राहिल्यास नुकत्याच दुरुस्त केलेल्या रस्त्यांची दुरवस्था होणार आहे. त्यामुळे सदरची वाहतूक श्रीरामपूर शहर व बेलापुरात काढण्यात येऊ नये अन्यथा या निर्णयाविरुध्द उद्यापासूनच उपोषणाचा अवलंब करावा लागेल असा इशारा आ. कानडे यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com