पितळ उघडे पडल्याने तनपुरेंचे नापास विरोधक वैफल्यग्रस्त

अभ्यासपूर्ण कामाच्या धडाक्यामुळे विरोधकांची निष्क्रीयता उघडी पडल्याचा भिटेंचा दावा
पितळ उघडे पडल्याने तनपुरेंचे नापास विरोधक वैफल्यग्रस्त

राहुरी | Rahuri

अडीच वर्षापासून राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेला लोकप्रतिनिधी नेमके काय काम करू शकतो, याची प्रचिती आली आहे. विकास कामात गती आणण्यासाठी प्रश्नांचा अभ्यास करून पाठपुरावा करीत प्रश्न मार्गी लागतात, याचे प्रत्यंतर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जनतेला आणून दिल्याने विरोध वैफल्यग्रस्त झाले आहेत. विकासकामात नापास विरोधकांचा धंदा जनतेने ओळखल्यानेच तनपुरे यांच्या नावाने शिमगा मांडला जातो, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी लगावला आहे.

सध्या राहुरी मतदारसंघ सत्ताधारी व विरोधी आघाडीतील कार्यकर्त्यांच्या एकमेकांवरील कुरघोड्यांनी ढवळून निघाला आहे. यासंदर्भात बोलताना भिटे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. वीज लोडशेडींग, पाणी व इतर प्रश्नात लक्ष देऊन मतदार संघात नव्या सबस्टेशनसह जवळपास 200 च्यावर नवीन रोहित्रे बसविले गेले. जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजे, याच भावनेतून आ. तनपुरे यांनी कामे केली. गावोगावी जनता दरबार भरवून प्रलंबीत कामे त्वरीत निकाली काढली. परंतू, केवळ सभामंडप व भेटीगाठीत भुलवून जनतेच्या मुलभूत समस्यांना कधीही हात न घातलेेले विरोधक आज बेताल झाले आहेत. आपल्या आमदारकीच्या काळात सतत दुजाभाव दाखविणारे आता आ. तनपुरेंवर दुजाभावाचा आरोप करून आपले हसू करून घेत आहेत, असे ते म्हणाले.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत सतत नाकारल्याने तनपुरेंचे विरोधक वैफल्यग्रस्त आहेत. फोटोबाजी करून कामे केल्याचा आव आणणार्‍यांना या नापास नेत्यांना जनता चांगलीच ओळखून आहे. वांबोरीसह परिसरातील विजेचा, पाण्याचा, वांबोरी चारीच्या पाण्याच्या प्रश्नाचा अभ्यास करून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहचविण्याचे प्रयत्न आ.तनपुरे यांनी केले. याउलट कृषि व इतर विभागाकडून बियाणे, औषधे, वीजपंप, शासकिय अनुदाने यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशी शिवाय काम करायचे नाही, असे निर्देश संबधित खात्यांना कोणी दिले होते? याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

राहुरी बाजार समितीच्या कारभाराला राज्य व देश पातळीवर गौरविण्यात आले. येथे मतदारांनी अरूण तनपुरेंवर विश्वास ठेवताना विरोधकांना कायमच नाकारले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काहींनी विधानसभेत 15 वर्षे तोंड उघडले नव्हते, हे जनतेने पाहिले आहे. मतदार संघातील जनता सुज्ञ असून भूलथापा देणार्‍यांना बळी पडणार नाही. यापेक्षा विरोधकांनी जनतेत जावे, असा उपरोधीक सल्ला भिटे यांनी दिला आहे.

नागरदेवळेसह तीन गावांची नगरपरिषद जनतेच्या भल्यासाठी होती. मात्र सरकार बदलताच निर्णय बदलून काहींनी आपली राजकीय इर्षा कुरवाळली. अशा दूरदृष्टी नसललेल्यांचे नेतृत्व राहुरीतील स्वयंघोषित नेते स्विकारतात. नगरपरिषदेत सलग चार पंचवार्षिक यांना जनतेने त्यांच्याच प्रभागात नाकारले आहे. स्वयंघोषित पुढारी राहुरीकरांचा कळवळा दाखवून आ. तनपुरेंवर आरोप करतात. त्यांची राजकीय दुकानदारी जनता आगामी निवडणुकीत बंद करणार आहे.

- नंदकुमार तनपुरे, माजी नगरसेवक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com