सौ. दुर्गाताई तांबे यांना कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान

सौ. दुर्गाताई तांबे यांना कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान

संगमनेर | प्रतिनिधी

महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम यांसह सातत्याने जनमानसांच्या विकासासाठी काम करणाऱ्या संगमनेर शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांना राज्यस्तरीय अत्यंत प्रतिष्ठेच्या कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज जीवन गौरव पुरस्काराने शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे.

नाशिक येथील सामाजिक, सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळ व सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते हे राज्यस्तरीय प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, शिर्डी संस्थांचे उपाध्यक्ष रवींद्र मिर्लेकर, महंत चरणदास महाराज यांचं विविध मान्यवर उपस्थित होते.

सौ. दुर्गाताई तांबे यांनी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून खेडोपाडी गावोगावी महिलांचे संघटन करुन महिलांची सबलीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली आहे. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, चर्चासत्र, वाचन ग्रुप, सहली याच बरोबर सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाच्या त्या प्रकल्प प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका सांभाळत आहेत. समाजकारणात नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने गोरगरीब, आदिवासी,अपंग, मूकबधिर यांच्यासाठी काम करत आहेत.

नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी स्वच्छतेवर अधिक भर देताना शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. याच बरोबर 25 नव्या गार्डनची निर्मिती, गंगामाई घाटाचे सुशोभिकरण, ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील वैभवशाली इमारती, हायटेक बस स्थानक, निळवंडे धरण पाईप लाईनमुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी योजना अशा सततच्या विकासकामांमुळे नगरपालिका देशपातळीवर व राज्यस्तरावर गौरवली गेली आहे. याच बरोबर स्वच्छ भारत अभियानातील उत्कृष्ट कामगिरीमुळे संगमनेर नगरपरिषदेला दिल्लीत राष्ट्रपती पुरस्काराने ही गौरवले आहे. आणि राज्यपातळीवर महाराष्ट्र शासनाने अनेक पुरस्कारांनी नगरपालिकेचा सन्मान केला आहे.

यापूर्वीही लेखिका, साहित्यिक, असलेल्या सौ दुर्गाताई तांबे यांना बुलढाणा येथील स्वर्गीय विलासराव देशमुख प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुणे प्रतिष्ठानचा पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, यशवंत वेणू पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

यानंतर यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, सातत्याने जनमाणसांसाठी काम करणारे अनेक व्यक्ती समाजात कार्यरत असतात. म्हणून समाज प्रगतीच्या दिशेने जातो आहे. अशा समाजाच्या मार्गदर्शक व्यक्तींचा होणारा सन्मान हा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. सौ.दुर्गाताई तांबे यांनी महिलांसाठी केलेले काम व शहराची सांभाळलेली धुरा अत्यंत कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, या पुरस्कारांमध्ये संगमनेर शहर व तालुक्यातील प्रत्येक नागरिकांची योगदान आहे. सर्वांचा विश्वास आणि मिळालेली संधी यामुळे आपल्याला हे काम करता आले असून या पुरस्कारामुळे काम करण्यासाठी आणखी बळ मिळाले आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ दुर्गाताई तांबे यांचे राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, माधवराव कानवडे, सौ.कांचनताई थोरात, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, शिवाजीराव थोरात, अमित पंडित ,बाबा ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, उपनगराध्यक्ष इब्राहीम देशमुख, लक्ष्मणराव कुटे, सौ. मीराताई शेटे, सौ.सुनंदाताई जोर्वेकर, शंकराव पा. खेमनर, दिलीपराव पुंड, यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com