
श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur
साखर कामगारांचे प्रश्न केंद्र व राज्य शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी केले.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्यावतीने येथील काँग्रेस भवनात आयोजित राज्यातील साखर कामगारांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून श्री. आदिक बोलत होते. फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, उपाध्यक्ष रामनाथ गरड, खजिनदार डी. एम. निमसे, संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, नेवासा तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष अशोकराव मिसाळ, माजी अध्यक्ष अशोकराव पवार, नरेंद्र डूबंरे (विघ्नहर), अनंत निकम, अर्जुन दुशिंग (राहुरी), बाळासाहेब हेगडे (इंदापूर), राहुल टिळेकर, रमेश यादव (अनुराज), भगवान जाधव (कादवा), संभाजी राजळे (वृद्धेश्वर) व्यासपीठावर होते.
श्री. आदिक म्हणाले, साखर कारखानदारीमधील कर्मचारी व कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कामगारांनी भक्कम तयारी व इच्छाशक्ती ठेवावी, त्यासाठी संघटना योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे. साखर कामगार विविध समस्यांना तोंड देत अनेक त्रास सहन करत आहेत. ज्या ठिकाणची कारखानदारी बंद पडली त्या ठिकाणचे कामगार देशोधडीला लागले आहेत. केंद्राने नवीन कामगार कायदे तयार केले असून त्याबाबत अधिक अभ्यास करून पुढील निर्णय घेतले जातील. सेवानिवृत्त कर्मचार्यांना योग्य ते निवृत्ती वेतन मिळावे, कामगारा़ंना आरोग्यविषयक सुविधा व कुटुंबाचा विमा असावा, असे आदिक म्हणाले.
सरचिटणीस नितीन पवार म्हणाले की, केंद्र सरकारने 44 कामगार कायद्याचे केवळ 5 कायद्यांत रूपांतर करून ठेकेदारी पद्धतीकडे केंद्र सरकारचा कल आहे. नवीन कायद्यात एकावेळी 300 कामगारांना क़ाढता येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे कारखानदार सुरक्षित आणि कामगार असुरक्षित असे धोरण आहे. कामगार आणि कामगार संघटनांचे अस्तित्व टिकविण्यासाठी कामगार संघटनांना पुन्हा एकदा क्रांतिची मशाल हाती घेण्याची वेळ आली आहे. हंगाम बंद झाल्यानंतर राज्यातील सर्व साखर कामगारांचा मेळावा घेण्यात येईल. यापुढे कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती कारखान्यात लागू होणार असून त्यामुळे साखर कामगार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
यावेळी नरेंद्र डूबंरे, अनंत निकम, अर्जुन दुशिंग, बाळासाहेब हेगडे, रमेश यादव, भगवान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. फेडरेशनचे संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी यांनी प्रास्ताविकातून साखर कामगार फेडरेशनच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. खजिनदार डी. एम. निमसे यांनी मागण्यांचे ठराव मांडले. ते सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
मेळाव्यास अॅड. जयंत चौधरी, संजय राऊत, आप्पासाहेब शिंदे, अण्णासाहेब गर्जे, सुरेश आरगडे, अंकुश दाभाडे, कारभारी लोडे, शिवाजी जाधव, विश्वास डेरे, सुभाष सोनवणे, बी. जी. पाटील, शाम जाधव, सुनील कालूंगे, नवनाथ माटकर यांचेसह मुळा, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, राहुरी, अनुराज शुगर, विघ्नहर, इंदापूर, कादवा, निफाड़ साखर कारखान्यांचे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विश्वनाथ औटी, बाळासाहेब ओमने, अशोक कटारे, काशीनाथ थोरात, विजय शिर्के आदींनी सहकार्य केले. विलास कुलकर्णी व अरुण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नेवासा तालुका साखर कामगार संघटनेचे सचिव संभाजी माळवदे यांनी आभार मानले.