नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

कोविड -19 मुळे मृत्यू झाल्यास राज्यातील साखर कामगारांच्या वारसाला किमान 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल

यासाठी साखर कामगारांना सुद्धा विमा कवच मिळावे अशी मागणी राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक व सरचिटणीस नितीन पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजितदादा पवार यांचे कडे केली आहे.

श्री.आदिक यांचे नेतृत्वाखालील साखर कामगार फेडरशेनच्या शिष्टमंडळाने आज बुधवार दि.16 डिसेंबर रोजी दुपारी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

निवेदनात म्हंटले आहे की,साखर उद्योग हा देशातील क्रमांक 2 चा कृषीमाल प्रक्रिया उद्योग आहे.साखर कामगार हा या उद्योगातील अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. सध्या असलेले तुटपुंजे वेतन व थकीत पगार यामुळे राज्यातील साखर कामगार मेटाकुटीस आलेला आहे. त्यातच देशात व आपले राज्यात कोविड -19 या महामारीने थैमान घातलेले आहे. अनेक साखर कामगार या महामारीचे बळी ठरत आहेत.कोविड -19 संसर्ग आजारामुळे मृत्यू पावलेल्या कामगारांना विमा कवच देणे अत्यंत गरजेचे आहे .

राज्यात पोलीस, आरोग्य व ग्रामविकास विभागातील कर्मचा-यांना देण्यात आलेल्या “ 50 लाखाचे विमा कवच "योजनेच्या धर्तीवर राज्यातील साखर उद्योगातील कामगारांचा कोविड -19 मुळे मृत्यू झाल्यास त्यांचे वारसांना किमान 5 लाख रूपये मदत मिळावी यासाठी " साखर कामगार विमा कवच " योजना राज्य शासन व साखर संघ यांचेमार्फत राबविणेत यावी.

यावेळी साखर कामगार फेडरशेनचे खजिनदार डी. एम.निमसे,संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, नेवासा तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष अशोकराव पवार आदी उपस्थित होते.