त्रिपक्ष समिती स्थापून साखर कामगारांना दिवाळीपूर्वी वेतनवाढ द्या

इंटकचे अध्यक्ष अविनाश आदिक यांची कामगारमंत्री वळसे पाटलांकडे मागणी
त्रिपक्ष समिती स्थापून साखर कामगारांना दिवाळीपूर्वी वेतनवाढ द्या

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन (इंटक) चे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील

यांची मुंबईत भेट घेऊन राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ देणारी त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करावी व दिवाळी पूर्वी साखर कामगारांना वेतनवाढ लागू करावी,अशी मागणी केली.

श्रीरामपूर येथील राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन पदाधिकार्‍यांच्या बैठकीस सरचिटणीस नितीन पवार, उपाध्यक्ष रामनाथ गरड, खजिनदार डी. एम. निमसे, संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, नेवासा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष अशोकराव पवार,काकासाहेब लबडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील साखर कामगारांकडे साखर कारखानदारांसह शासनाचे कायमच दुर्लक्ष होत आहे. साखर कामगारांना मिळणारे वेतन इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी असते. राज्यातील साखर कारखान्यातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्च 2019 रोजी संपली आहे. 01 एप्रिल 2019 पासून राज्यातील साखर कामगारांचे वेतनवाढ, सेवा-शर्ती व इतर न्याय हक्कासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठित करून कामगारांना नवीन 40 टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केलेली आहे.

त्याबाबत राज्यातील सर्वच साखर कामगार संघटनांनी यापूर्वीच साखर कामगारांच्या वेतनवाढ व इतर न्याय हक्काचे मागणीचे पत्र राज्य शासन व साखर संघाला दिलेले आहे. परंतु 17 महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील शासन व साखर संघ पातळीवर या मागण्यांबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील साखर कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.

यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. तरी देखील त्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. यावरून राज्यातील साखर कामगार कायमच उपेक्षित राहत असल्याचे दिसून आले आहे अशा तीव्र भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री व साखर संघाचे अध्यक्ष यांच्याकडे शिष्टमंडळ नेऊन राज्यातील साखर कामगारांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवाव्यात असा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार श्री. आदिक यांनी गुरुवार दि.15 ऑक्टोबर रोजी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करावी, दिवाळी पूर्वी साखर कामगारांना वेतनवाढ लागू करावी, अशी मागणी केली. कामगार मंत्र्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com