ऑनलाईनच्या किचकट प्रणालीमुळे रिक्षा चालक मदतीपासून वंचित

आतापर्यंत 70 परवानाधारकांनीच भरली अचूक माहिती
ऑनलाईनच्या किचकट प्रणालीमुळे रिक्षा चालक मदतीपासून वंचित
File Photo

अहमदनगर (प्रतिनिधी) - ऑनलाईन अर्ज करण्यास रिक्षा चालकांना अडचणी येत असल्याने आजही अनेक रिक्षा चालक मदतीपासून वंचीत आहे. नगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या तीन हजार 520 रिक्षाचालकांपैकी आतापर्यंत एक हजार रिक्षा चालकांनी अर्ज केले. त्यातील 70 रिक्षा चालकांनी अचूक माहिती भरल्याने त्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुमारे साडेतीनशे रिक्षा चालकांनी माहिती अपूर्ण भरल्याने त्यांना अर्ज करण्यास पुन्हा संधी देण्यात आली आहे. आजही अनेक रिक्षा चालकांनी अर्ज केला नसल्याने त्यांना मदत मिळालेली नाही. ऑनलाईनच्या किचकट प्रणालीमुळे ते मदतीपासून वंचीत राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली. घोषणा केल्यानंतर दीड महिन्यांनी त्यावर परिवहन विभागाकडून कार्यवाही सुरू झाली. यासाठी रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. परवानाधारक रिक्षा चालकांना ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर दीड हजार रुपयांची मदत मिळणार आहे. अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नगर शहरासह नगर तालुका, शेवगाव, कर्जत, जामखेड, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यातील तीन हजार 520 रिक्षाचालकांची नोंद आहे.

नोंदणी असलेल्या रिक्षा चालकांना अर्ज करण्याचे आवाहन परिवहन कार्यालयाने केले आहे. नोंदणीकृत रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी येत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. आधार क्रमांक असला तरी तो बँक खात्याला लिंक नाही. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सेतू कार्यालयात जावे लागते. खात्याला आधार लिंक करण्यासाठी बँकेत गेल्यावर वेगळेच उत्तर मिळते. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने तुटपुंजी मदत दिली, त्यात अनेक अटी घातल्या गेल्याने रिक्षा चालकांमध्ये नाराजीचा सुरू आहे. मदत जाहीर होऊन देखील ऑनलाईन प्रणालीमुळे ते मदतीपासून वंचीत राहणार आहे.

सेतूमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज केला. बँक खात्याला आधार नंबर लिंक नसल्याने अर्ज बाद होणार असल्याचे सांगण्यात आले. दीड हजार रुपये ही तुटपुंजी मदत आहे. त्यात ऑनलाईन प्रणालीमुळे रिक्षा चालकांना अर्ज करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परवानाधारक रिक्षा चालकांची नोंद परिवहन कार्यालयाकडे असल्याने त्याठिकाणी रिक्षा नंबर व आधार कार्ड दाखवून रोख स्वरूपात मदत मिळावी, अशी मागणी आहे.

- गोरक्ष शिंदे (रिक्षा चालक, नगर)

माझा आधार नंबर बँक खात्याला लिंक आहे. परंतु अर्ज कसा करायचा याचे ज्ञान नाही. यामुळे अर्ज भरला नाही. त्यामुळे अजून मदत मिळालेली नाही. परिवहन कार्यालयाने रोख स्वरूपात मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे.

- कैलास जाधव (रिक्षा चालक, नगर)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com