‘अगस्ति’ने घेतलेल्या कर्जाचा विनियोग सुयोग्य करावा

समन्वय समितीची पत्रकार परिषदेत मागणी
‘अगस्ति’ने घेतलेल्या कर्जाचा विनियोग सुयोग्य करावा
साखर कारखाना

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा कारभार काटकसरीने चालवावा, कारखान्याने नुकतेच काढलेल्या कर्जाचा विनियोग चांगला करावा या हेतूने कारखान्याचे संचालक मंडळ, कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापना सोबत संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी समन्वय समितीचे बी.जे.देशमुख, दशरथ सावंत व डॉ. अजित नवले यांनी केली.

अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे समन्वय समितीच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.अजित नवले म्हणाले, ‘अगस्ती’चे उपाध्यक्ष सिताराम पा. गायकर यांचे समवेत शासकीय विश्रामगृह येथे 15 दिवसांपूर्वी समन्वय समितीने चर्चा केली. यावेळी नव्याने घेतलेल्या कर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा, चालू वर्षाचा हंगाम सुरळीत सुरू व्हावा, शेतकरी व कामगार यांची देणी देण्याविषयीचे नियोजन, वाहतूकदार, ऊस तोडणी कामगार अ‍ॅडव्हान्स, कारखाना क्षेत्रातील ऊसतोड इ. बाबतीत चर्चा करण्यासाठी मिटिंग आयोजित करण्याचे कबूल केले होते मात्र अद्याप बैठक आयोजित केलेली नाही, संवादाची दारे बंद करू नका, आम्ही ज्या सूचना करणार आहोत, त्या मान्य करण्याचा सर्वस्वी अधिकार संचालक मंडळाचा आहे, असे सांगत कर्ज मिळवून देण्यासाठी आ. डॉ.किरण लहामटे यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले. त्यामुळे त्या कर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा या साठी बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

बी. जे. देशमुख म्हणाले, आम्ही गळीत हंगाम सुरू होईपर्यंत सहकार्य करणार आहोत, मात्र कारखाना पारंपारिक पध्दतीने न चालविता त्याला उभारी मिळावी म्हणून आम्ही कारखाना व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्या समवेत चर्चा करण्याचे ठरले असताना अशी चर्चा झाली नाही. ही माहिती सभासदांना व्हावी म्हणून पत्रकार परिषद घेतली आहे. अजितदादा पवार यांनी जिल्हा बैंकेला कर्ज देण्याबाबत सूचना केली होती. यामध्ये अजितदादा स्वतः लक्ष घालणार असल्याने आम्ही सध्या शांत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येेष्ठ नेते दशरथ सावंत म्हणाले, आम्ही कारखान्याला सहकार्य करण्याचे ठरविले आहे मात्र सभासदांच्या हिताला बाधा येणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कारखान्यात झालेल्या ब्यूशर चोरी बद्दल पोलिसांकडे तक्रार करावी, अशी मागणी त्यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com