अगस्तिची निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची?

पिचडांचा बिनविरोधचा प्रस्ताव; विरोधकांची पहिली बैठक संपन्न
अगस्तिची निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची?
SUJATA

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखाना निवडणूक 17 जुलै रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास काल 14 जूनपासून सुरुवात झाली. दरम्यान निवडणुकीच्यादृष्टीने विविध राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव सर्वपक्षीय कार्यकर्त्यांपुढे ठेवला आहे तर पिचडांच्या राजकीय विरोधकांची कारखाना निवडणुकी संदर्भात प्राथमिक स्वरूपाची बैठक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या अकोले येथील निवासस्थानी झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आर पी आय, शेतकरी संघटना या पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अकोले, इंदोरी, आगर, कोतूळ, देवठाण या पाच उत्पादक गटांतून प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 जागा, सोसायटी व संस्था मतदार संघ, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ, इतर मागास प्रवर्ग यातून प्रत्येकी 1 व महिला राखीव मतदारसंघातून 2 जागांचा समावेश आहे. 17 जुलैस होऊ घातलेल्या निवडणुकीत फक्त 8 हजार 342 सभासद मतदार म्हणून पात्र आहेत. यात सुमारे 3300 आदिवासी शेतकरी मतदार असून उर्वरीत बिगर आदिवासी ऊस उत्पादक आहेत. पूर्वी सभासद संख्या 32 हजारांहून अधिक होती.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पिचड विरोधकांची अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोकराव भांगरे यांच्या निवासस्थानी प्राथमिक बैठक पार पडली. यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, सेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे, प्रदिप हासे, महेश नवले, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले, अ‍ॅड. शांताराम वाळुंज, माकपचे नेते कॉ. डॉ. अजित नवले, आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे, चंद्रकांत सरोदे, शेतकरी संघटनेचे नेते व कारखान्याचे संचालक अशोकराव आरोटे आदी उपस्थित होते.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या विरोधात निवडणुकीस सामोरे जाण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. दरम्यान काल माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी अगस्ति कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा यावेळीही सर्वांनी कायम ठेवावी व तालुक्याची कामधेनू वाचविण्याची जाहीर हाक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना दिली आहे तर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक बी. जे. देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपासून अगस्तिच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित करत माजी मंत्री पिचड व उपाध्यक्ष गायकर तसेच संचालक मंडळाविरुद्ध आवाज उठविला आहे.

त्यांची भूमिका काय असेल हे येत्या काही दिवसांत जाहीर होईल. मात्र सध्या आगामी संचालक मंडळात आपला नंबर मधुकरराव पिचड पिता-पुत्रांकडून की सीताराम गायकर व आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडून लागेल, या द्विधा मनःस्थितीत अनेक कार्यकर्ते दिसत आहेत. तरुण सभासद, शेतकरी हे सत्ताधारी व विरोधी दोन्ही व्यतिरिक्त तिसर्‍या पॅनेलची चर्चा करत आहेत. जर निवडणूक बिनविरोध होणार असेल तर काय भूमिका घ्यावी? या विचाराने काही जण चिंतेत असल्याचे दिसत आहेत.

काही काठावरील पुढारी अडकले आहेत. विविध राजकीय पक्षांतील पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना ही निवडणूक कशी राहील याबाबत अनेकजण संभ्रमावस्थेत असल्याने त्यांची अवस्था ‘एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात’ आहे. अशा संधिसाधूंबाबत पिचड व गायकर दोन्हींकडूनही सावध पवित्रा घेण्यात येत आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार हे चित्र काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com