
कर्जत l प्रतिनिधी
आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत अनेक वस्तूंची चोरी होण्याचे प्रकार घडतात. चोरी झाल्यानंतर व चोर पसार झाल्यावर चोरी झाल्याचा प्रकार आपल्या निदर्शनास येतो मात्र, पर्स व पिशवीत हात घालून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या महिलांचा कट कर्जत पोलीस पोलिसांनी उधळून लावला.
१६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राशीन येथील आठवडे बाजारात काही अनुचित प्रकार घडू नयेत तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी कर्जत पोलीस पायी गस्त घालत होते. बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावर प्रसिद्ध असलेल्या चिंचेच्या झाडाखाली भाजी विक्रेते व इतर साहित्य विक्रेत्यांजवळ काही ग्राहक व महिला भाजीपाला खरेदी करत असताना या महिलांभोवती घोळका करून व त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांच्याजवळ असणाऱ्या पर्स व पिशवीत हात घालून चोरीचा प्रयत्न करताना चार महिला आढळल्या.
त्यावेळी कर्जत पोलीस भाजी विक्रेते सुभाष सायकर, तुळशीराम सायकर, संजय राऊत आदींनी महिला कॉन्स्टेबल यांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेत असताना त्यातील दोन महिला पळून जाऊ लागल्या. मात्र पाठलाग करुन महिला कॉन्स्टेबल पुरी यांनी त्यांना आपल्या ताब्यात घेत राशीन पोलिस दुरक्षेत्र येथे आणले. त्यांना बाजारात येण्याचा उद्देश विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या महिला चोरीच्या उद्देशानेच बाजारात आल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललिता अमोल पवार वय-२८ (रा.अरणगाव ता.जामखेड), राधिका मनोहर काळे वय-२१ (रा.पाथरुड ता. भुम), चिंगु समिर सय्यद वय-२१ (रा.नेवासा फाटा ता.नेवासा), राणी किरण काळे वय-३५ (रा. पाथरुड ता.भुम) अशी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसात कलम ३७९, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ महिलांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, भगवान शिरसाठ, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम सातपुते, मारुती काळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, भाऊसाहेब काळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी पुरी आदींनी केली.