उसनवार पैशातून एकावर चाकूने हल्ला

उसनवार पैशातून एकावर चाकूने हल्ला

पाथर्डी पोलिसांत संशयितावर गुन्हा दाखल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

उसने मागितलेले हजार रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाने मित्रावरच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.18) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरात शेवगाव रोडवर घडली.

रिजवान राजू पठाण (रा.भिकनवाडा,पाथर्डी) असे हल्ला करणार्‍या संशयिताचे नाव आहे. त्याने गणेश दिलीप लबडे याच्या पोटात चाकू मारून त्याला गंभीर जखमी केले. यात गणेश लबडे गंभीर जखमी झाला असुन त्याला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. ेरिजवान पठाण याने कोरडगाव चौकातील शेवगाव रोडवरील गणेश लबडे याच्या मोबाईल शॉपीमध्ये मोटारसायकल घुसवून दुकानाचे नुकसान करून लबडे याच्या पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे हे पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. रिजवान पठाण याने गणेश लबडे याला फोन करून एक हजार रुपये मागितले होते. त्यावरून त्यांचा फोनवर किरकोळ वादही झाला होता. मी दुकानात आलो तर काही खरे नाही, असे रिजवानने फोनवरूनच धमकावले, असे गणेशने सांगितले. त्यानंतर रिजवान पठाण मोटारसायकल घेऊन मोबाईल शॉपीमध्ये आला. गाडी दुकानात घुसवल्याने समोरच्या काचेचे शोकेस फुटले. त्यानंतर शिवीगाळ करीत रिजवान पठाण याने चाकू काढला व तुला जीवे मारतो, असे म्हणत गणेशच्या पोटावर वार करून पळून गेला.

गणेशला नातेवाईकांनी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून नगरला पाठविले. तेथे उपचार घेत असताना गणेश लबडे याने पोलिसांना जबाब दिला आहे.या जबाबावरून पोलिसांनी अनाधिकाराने दुकानात घुसून मारहाण व शिवीगाळ करून दुकानाचे नुकसान करून खुनाचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे तपास करीत आहेत. रिजवान पठाण पसार झाला आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Related Stories

No stories found.